महाबळेश्वरच्या डोंगर रांगांत अनेक सुंदर पॉइंट्स दुर्लक्षित

वन विभागाच्या वतीने त्यांचा विकास करण्यात येईल.

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 महाबळेश्वरच्या डोंगर रांगांत अनेक सुंदर पॉइंट्स दुर्लक्षित आहेत,अशा पॉइंट्सचा शोध घेऊन वन विभागाच्या वतीने त्यांचा विकास करण्यात येईल. यानंतर हे पॉइंट्स पर्यटकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली.थंड हवेचे ठिकाण म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथे निसर्गसौंदर्याचा प्रचंड खजिना आहे. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी महाबळेश्वर येथे एकापेक्षा एक सरस पॉइंट्स येथे आहेत; परंतु तेच तेच पॉइंट्स पाहून पर्यटक कंटाळले आहेत. अनेक वेळा नियमित येणारे पर्यटक पॉइंट्सला जातच नाहीत. त्याचप्रमाणे ऑर्थरसीट पॉइंट या मार्गावरच पर्यटकांची गर्दी होते. त्यामुळे त्या भागात वाहतुकीची कोंडी होते. पर्यटकांना वेगवेगळ्या भागांत पॉइंट्स उपलब्ध करून दिले तर एकाच भागात होणाऱ्या पर्यटकांच्या गर्दीचे विकेंद्रीकरण होईल. त्यामुळे वन विभागाने महाबळेश्वरच्या जंगलात व डोंगरात लपलेल्या आणि दुर्लक्षित पॉइंट्सचा शोध सुरू केला आहे. यात अवकाळी येथे रॉजमन रॉक, तर मांघर येथे नॉर्थकोट असे दोन पॉइंट्स आढळले आहेत. या दोन्ही पॉइंट्सची पाहणी उपवनसरंक्षक महादेव मोहिते यांनी रविवारी केली. या ठिकाणी पर्यटकांची सुरक्षा व इतर सोयी-सुविधा याबाबत मोहिते यांनी वन विभागास सूचना केल्या आहेत. ग्रामीण भागात अशा दुर्लक्षित पॉइंट्सची माहिती असल्यास ती वन विभागाला कळविण्याचे आवाहनही वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी यांनी केले.

पॉइंट्सची पाहणी करताना यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, वनक्षेत्रपाल श्रीकांत कुलकर्णी, वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक लहू राऊत, तानाजी केळगणे, अवकाळी वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू भिलारे, सदस्य विजय भिलारे, दत्तात्रय भिलारे, मनोहर भिलारे, यशवंत भिलारे, संजय भिलारे, संदीप भिलारे, श्रीपती भिलारे, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post