पुढील वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांची फौज उतरवण्याची भाजपची तयारी
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
पुढील वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांची फौज उतरवण्याची तयारी भाजपने केली आहे. पक्षाच्या 100 खासदार व मंत्र्यांवर प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.पक्षश्रेष्ठीनी त्यांना विधानसभा निवडणुकांमध्ये झोकून देण्याचे फर्मानच काढले आहे. त्यामुळे या खासदारांची सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाकडे पाठ असणार आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच सर्व खासदारांना 'शिस्ती'चा डोस पाजत त्यांची 'हजेरी' घेतली होती.
भाजपपुढे विरोधकांच्या आघाडीचे तगडे आव्हान उभे राहणार आहे. त्यामुळे पायाखालची वाळू घसरली असल्याने भाजपने प्रचाराची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर खासदारांची फौज प्रचारात उतरवली जाणार आहे. येत्या सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हजेरी लावू नका, त्याऐवजी पक्षाने सोपवलेली निवडणूक प्रचाराची जबाबदारी पार पाडा, असे स्पष्ट फर्मान पक्षश्रेष्ठीनी संबंधित 100 खासदार आणि मंत्र्यांना काढले आहे. या टीममध्ये लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या खासदारांचा समावेश आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन आणखी दोन आठवडे सुरू राहणार आहे. 23 डिसेंबरला अधिवेशनाची सांगता होणार आहे; परंतु या दोन आठवडय़ांत 100 खासदार निवडणूक प्रचारात व्यस्त राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्षाच्या सर्व खासदारांची 'हजेरी' घेतली होती. शिस्तीत राहा, संसदेत वेळेवर या, दांडी मारू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. याचदरम्यान पक्षश्रेष्ठाRनी 100 खासदारांच्या खांद्यावर विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी सोपवल्यामुळे मोदींच्या सूचनेलाच 'तिलांजली' दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
कुणावर कुठली जबाबदारी…
- महाराष्ट्रातील खासदारांना गोव्यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- आसामसह इतर उत्तर-पूर्व राज्यांतील खासदारांवर मणिपूर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी.
- हिमाचल प्रदेश, हरयाणा, दिल्लीतील खासदार पंजाबमध्ये राबणार.
- इतर राज्यांतील खासदार आणि मंत्र्यांची फौज उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या प्रचारात उतरणार.
- सर्व निवडणुका होईपर्यंत त्या-त्या राज्यांत मुक्काम ठोकून राहण्याच्या सक्त सूचना.
Comments
Post a Comment