उसाच्या शेतात सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा.

 आरोपीची बायको विद्यमान सरपंच...

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पाथर्डी तालुक्यातील जांभळी येथील उसाच्या शेतात सुरू असलेल्या बनावट देशी दारूच्या कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत लाखो रुपयांचा माल जप्त केला आहे. तर, हा कारखाना चालविणाऱ्या विजय बाबूराव आव्हाड याला ताब्यात घेतले.सायंकाळी उशिरापर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दोन वर्षांपूर्वी आव्हाड याच्या तालुक्यातील माळी बाभूळगाव येथील कारखान्यावर सुद्धा पोलिसांनी छापा टाकत त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

आव्हाड हा आपल्या जांभळी येथील उसाच्या शेतात बनावट दारू बनवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी साध्या वेशात जात छापा टाकला. तेथे पोलिसांना भिंगरी, टँगो व मोसंबी या बनावट दारूचे 84 बॉक्स, लेबल, रिकामी खोकी, बूच, रिकाम्या बाटल्यांच्या 70 गोण्या, स्पिरिट, जनरेटर असे साहित्य आढळले. पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी विजय आव्हाड हा आपल्या घरात जेवण करीत होता. तर, कारखान्यात एकही कामगार नव्हता. पोलिसांनी छापा टाकल्यानंतर दारू प्रतिबंधक विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले. जप्त केलेल्या मालाचा पोलीस दिवसभर पंचनामा करीत होते.

पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक निरीक्षक प्रवीण पाटील, रामेश्वर कायंदे, निरंजन वाघ, कॉन्स्टेबल अनिल बडे, भगवान सानप, राहुल तिकोने, अल्ताफ शेख, देवीदास तांदळे, सागर मोहिते, राजेंद्र सुद्रुक, प्रतिभा नागरे, विजय बेरड, सदानंद बारसे, देवीदास पाचगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 विजय आव्हाड याची बायको सध्या जांभळी गावची सरपंच आहे. रात्रभर बनावट दारू बनवायची व तालुक्यासह मराठवाडय़ातील अनेक हॉटेल्स व ढाब्यांवर ती पोहोचवायची, असा उद्योग आव्हाड हा काही साथीदारांमार्फत करीत होता.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार