भाजप आमदारानं मनसेच्या आमदाराची भेट घेतल्यानं तर्क वितर्कांना उधाणदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा

 सध्या भाजप-मनसेच्या युतीची चर्चा रंगली असताना एका भाजप आमदारानं मनसेच्या आमदाराची भेट घेतल्यानं तर्क  वितर्कांना उधाण आलाय.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे बडे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्याच बरोबर मनसेचे एकमेव निवडून आलेले आमदार राजू पाटील यांच्या भेटीला देखील बडे नेते ग्रामीण भागात येऊ लागलेत. शुक्रवारी रात्री सातारा-जावळीचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार राजू पाटील यांची भेट घेतलीय. ही सदिच्छा भेट असल्याचं बोललं जात असलं, तरी निवडणुकी आधी होणाऱ्या या भेटीगाठीनं भाजपा मनसे युतीच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. मनसे पक्षाकडे सध्या एकच आमदार असला तरी विरोधी पक्ष म्हणून पक्षाचा कायम दबदबा राहिलाय.

दिवा जवळील खार्डी गावात स्व. रतनबुवा स्मृती चषक प्रस्तुत खार्डी चषक व नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप या टेनिस क्रिकेट स्पर्धेचं  आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या अंतिम सामना पाहण्यासाठी, तसेच पारितोषिक वितरण समारंभात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले खार्डी गावात आले होते. क्रिकेट सामन्यानंतर त्यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयास देखील भेट दिली. या भेटीमुळं मनसे-भाजपा युतीच्या चर्चांना उधाण येत आहे. क्रिकेट सामन्यासाठी आमदार भोसले आले होते. जवळच माझे घर आणि कार्यालय असल्यानं मी त्यांना आमंत्रण दिलं आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि आम्ही भेटलो. ही केवळ एक सदिच्छा भेट असल्याचं मनसे आमदार पाटील यांनी सांगितलंय. ही सदिच्छा भेट असली तरी यामागं राजकीय घडामोडी सुरु असल्याची कुणकुण लागत आहे.एकीकडं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी भेट घेतली होती, तसेच भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील राज यांची भेट घेतली होती. स्थानिक पातळीवर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या भेटीला देखील भाजपाची नेते मंडळी येत आहेत. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटीलयांच्या नेतृत्वाखाली जन आशीर्वाद यात्रेत मनसे आमदार पाटील सामील झाले होते. दरम्यान, आमदार पाटील यांनी 'पाटील दिल्ली गाजवतील' असा हटके बॅनर लावत कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या होत्या. या पाटील बॅनरची चर्चा त्यावेळी चांगलीच गाजली, तर दुसरीकडे मनसे पक्षाच्या डोंबिवलीतील जनसंपर्क कार्यलय उद्घाटन प्रसंगी भाजप आमदार रवींद्र चव्हाण आणि नगरसेवक राहुल दामले यांनी भेट दिली होती. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक  जवळ आलीय. मनसेचं कल्याण-डोंबिवलीत पहिल्यापासून वजन राहिलंय, तर डोंबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला असून संघाचा देखील एक होल्ड या भागात आहे. सेना-भाजपा युती काळात आमदार चव्हाण यांच्या विजयात सेनेचा खारीचा वाटा राहिला आहे. त्यामुळं मनसे-भाजपच्या या भेटीला वेगळं महत्व प्राप्त झालंय.

Post a Comment

Previous Post Next Post