पंतप्रधान गप्प का आहेत..?
दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :
बंगळूरु येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने महाराष्ट्रात तणाव वाढला आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं जात असून निषेध नोंदवला जात आहे. त्यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्या विरोधातही संतापाची लाट आहे.मुंबईतही दादर, लालबाग परिसरात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपा विरोधात संताप व्यक्त केला असून पंतप्रधान गप्प का आहेत? अशी विचारणा केली.
लालबागमध्ये आंदोलनादरम्यान एबीपी माझाशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं फक्त स्वप्न दाखवलं नाही तर ते साकारही केलं. त्या महाराजांचा अपमान भाजपाच्या सरकारमध्ये त्यांच्या आशीर्वादाने होत असेल तर देशाचे पंतप्रधान गप्प का? आमच्यात प्रचंड राग असून तो व्यक्त करत आहोत. तो राग संयमी पद्धतीने व्यक्त करत आहोत त्याची दखल घ्या".
Comments
Post a Comment