परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई आज करण्यात आली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली असून यासंबंधी आजच आदेश दिला गेला


दैनिक हुपरी समाचार : 

 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई आज करण्यात आली आहे.बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई केली गेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फाईलवर स्वाक्षरी केली असून यासंबंधी आजच आदेश दिला गेला आहे.

आयएएस अधिकारी देबाशिष चक्रवर्ती यांनी परमबीर सिंग यांच्यासंबंधी दाखल केलेला अहवाल महाराष्ट्र सरकारने स्वीकारला आहे. परमबीर सिंग यांनी नागरी सेवेच्या नियमाचं उल्लंघन केल्याने देबाशिष चक्रवर्ती यांनी त्यांच्याविरोधात चौकशी केली होती. याशिवाय प्रशासकीय त्रुटींसाठी राज्याच्या गृह विभागाने त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी लावली होती.

याआधी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंग यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असं सांगितलं होतं. "बेशिस्त वर्तन आणि अनियमितता यासाठी परमबीर सिंग यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. त्यांच्यावरील निलंबनाची कारवाईची प्रक्रियादेखील सुरु आहे," असं त्यांनी सांगितलं होतं.

राज्य सरकार आपले काम करत आहे, असे सांगत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, परमबीर सिंग मुंबईत परतल्यानंतर त्यांनी त्याबाबत सरकारला कळवलेले नाही. तसेच त्यांनी होमगार्डच्या महासंचालक पदाचा पदभारही स्वीकारलेला नाही. तसेच परमबीर सिंग यांना न्यायालयाने फरारही घोषित केले होते. असे असतानाही त्यांना शासकीय गाडी आणि इतर शासकीय सुविधा कशा दिल्या गेल्या याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्या प्रकारे ते गाडीचा वापर करत आहेत ते चुकीचे आहे. ते कामावर नाहीत. त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. तरीदेखील ते गाडी वापरत आहेत. हे चुकीचे आहे आणि याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत, असे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले होतं.

Post a Comment

Previous Post Next Post