हे लोकशाहीत चालते का..? उपमुख्यमंत्री अजित पवारदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 विधिमंडळात 170 आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या सरकारने राज्यपालांकडे विधान परिषदेवर नियुक्तीसाठी बारा नावे पाठवली आहेत. त्याच्या बद्दल निर्णय झाला नाही हे कशा मध्ये बसते..?, हे योग्य आहे का..? हे लोकशाहीत चालते का..? , अशी प्रश्नांची सरबत्ती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून नावांची शिफारस राज्यपालांना करण्याबाबत मंत्रिमंडळात मान्यता देण्यात आली. त्यासाठी विद्यापीठ अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही घेण्यात आला. यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

आमदार होण्याची संधी गरजेची

यानिमित्ताने अजित पवार यांनी राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, सरकारने राज्यपालांकडे विधान परिषदेवर नियुक्तीसाठी बारा नावे पाठवली आहेत. या नावांना अंतिम मंजुरी देण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. लोकशाही पद्धतीने नावे आल्यानंतर जी नियमावली आहे त्यात बसतात का? हे तपासून त्यांना आमदार होण्याची संधी दिली पाहिजे, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार म्हणाले की, आरोप तर सध्या खूप सुरू आहेत. सध्या काहींना आरोपांशिवाय काही राहिलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला.

सरकारचा हस्तक्षेप नाही

कुलगुरू नियुक्तीबाबतचे राज्यपालांचे अधिकार कमी करता येत नाहीत, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यासंदर्भात पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, अधिकार कमी केले जात नाही. कुलगुरूंच्या नियुक्तीसाठी स्थापन करण्यात आलेली समिती योग्यतेनुसार पाच ते सहा नावांची शिफारस करते. त्यातील दोन नावे सरकार राज्यपालांकडे पाठवते. ही पाच-सहा नावे सरकार नव्हे, तर समिती ठरवते. यामध्ये सरकारच्या हस्तक्षेपाचा प्रश्न येतो कुठे, असा सवाल यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केला.

केंद्राच्याच पद्धतीचे अनुकरण

विद्यापीठ अधिनियमातील सुधारणांच्या संदर्भात सरकारची भूमिका स्पष्ट करताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, केंद्र सरकारची जी पद्धत आहे त्याचेच आम्ही अनुकरण करणार आहोत. राज्यपालांचे अधिकार कमी होणार नाहीत. तेच कुलगुरू नेमणार आहेत. ही प्रक्रिया पारदर्शकच असेल. कुणाशी तरी तुलना करून कुलगुरू होणाऱयांचा अपमान करू नये. भाजपशासित राज्यांमध्येही प्रकुलपती आहेत याकडेही उदय सामंत यांनी लक्ष वेधले.

Post a Comment

Previous Post Next Post