विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीवर भाजपची जोरदार टीका

विरोधी पक्षनेतेे प्रविण दरेकर  सभापती विरोधात अविश्वास आणणार 

दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 मुंबई | राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन प्रचंड वादळी होत आहे. विविध मुद्दयांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजपमध्ये जोरादार जुंपली आहे. अशातच आता विधानपरिषद उपसभापती पदावरून वाद रंगला आहे

विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या कार्यपद्धतीवर भाजपनं जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेतेे प्रविण दरेकर यांनी सभापती विरोधात अविश्वास आणणार असल्याचं म्हटलं आहे.

निलम गोऱ्हे या शिवसेनेच्या आघाडीच्या महिला नेत्या आहेत. आपल्या आक्रमक आणि अभ्यासपुर्ण भाषणांनी त्यांनी अनेकदा विरोधकांना नामोहरण करून सोडलं आहे. पण त्या सध्या वादात अडकल्या आहेत.

निलम गोऱ्हे यांनी विश्वासार्हता गमावली आहे. परिणामी त्यांना या पदावर राहण्याचा कसलाही अधिकार नाही, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडं गोऱ्हे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव आम्ही दाखल केला असल्याची माहिती दरेकर यांनी दिली आहे. दरेकर यांनी संविधानाच्या अनुच्छेद 183/ग नियम 11 अन्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे.

उपसभापती हे संवैधानिक पद आहे या पदावरील व्यक्ती राजकीय भूमिका घेत असतील तर हा त्या पदाचा अपमान आहे. गोऱ्हे यांनी उपसभापती पदावर असताना राजकीय भूमिका घेतली आहे, परिणामी त्याना पदावरून हटवण्यात यावं, असं दरेकर म्हणाले आहेत.

उपसभापती मोहदयांनी अकोला महापालिकेची लक्षवेधी राखीव ठेवावी असं ठरलं असताना चर्चेला आणली आणि शिवसेनेच्या गोपीकिशन बाजोरियांना एकट्यालाच बोलायची संधी दिली हा पक्षपात आहे, अशी टीका दरेकर यांनी केली आहे.

निलम गोऱ्हे या सध्या विधानपरिषदेच्य उपसभापती आहेत की त्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत. गोऱ्हे यांनी आपल्या वक्तव्यांच्या माध्यमातून प्रवक्ता असल्यासारखं दर्शवलं आहे.निलम गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वास ठराव हा मांडण्यात आला आहे. विरोधी पक्षांच्या वतीनं प्रविण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी आधीच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून अडचणीत आली आहे. अशातच आता हा विधानपरिषदेचा वाद उद्भवल्यानं परत ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत.


.

Post a Comment

Previous Post Next Post