भाजपने सहकार्य केले तर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन याच अधिवेशनात मागे घेतले जाण्याची शक्यतादैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी, यासाठी विरोधी पक्ष भाजपने सहकार्य केले तर भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन याच अधिवेशनात मागे घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवडणूक घेण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. महाविकास आघाडी सरकारकडे १७० आमदारांचे बहुमत आहे. त्यामुळे अध्यक्षांची निवड करण्यात आता कोणतीही अडचण नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र अध्यक्षपदासाठी आमचा उमेदवार राहील, असे सांगून निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. तथापि, भाजपने उमेदवार देऊ नये आणि निवडणूक बिनविरोध करावी आणि त्या बदल्यात भाजपच्या १२ सदस्यांचे निलंबन मागे घेतले जावे, असा प्रस्ताव असल्याची आणि त्यावर दोन्ही बाजूंच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली.

निलंबनाचा काळ कमी करा

मतदारांनी आम्हाला विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिले आहे. मात्र, निलंबित असल्याने ते आम्हाला मांडता येत नाहीत. म्हणून आमच्या निलंबनाचा कालावधी कमी करा आणि याच अधिवेशनात कामकाजात सहभागी होऊ द्या, असे पत्र भाजपच्या १२ आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना बुधवारी दिले.

आवाजी मतदानाने अध्यक्ष निवडीवरून खडाजंगी

- विधानसभा अध्यक्षांची निवड आवाजी मतदानाने करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावरून विरोधी पक्ष सदस्यांनी सरकारला घेरले.

- या सरकारचा आपल्याच आमदारांवर विश्वास नाही, हे सरकार घाबरलेले आहे. सरकारबद्दल सत्तारुढ आमदारांमध्येच रोष आहे आणि तो गुप्त मतदान घेतले तर व्यक्त होईल, अशी सरकारला भीती वाटते, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post