टीईटी गैरव्यवहार : जी ए सॉफ्टवेअरचा व्यवस्थापक अश्विनकुमार याच्या बंगलुरुच्या घरातून

पुणे पोलिसांनी तब्बल १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचे सोने, चांदी व हिरे अशी मालमत्ता जप्त केली


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

पुणे : टीईटी गैरव्यवहारात सहसंचालक तुकाराम सुपे याच्या घरातून व इतर नातेवाईकांकडून सव्वा तीन कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्यानंतर आता जी ए सॉफ्टवेअरचा व्यवस्थापक अश्विनकुमार याच्या बंगलुरुच्या घरातून पुणे पोलिसांनी तब्बल १ कोटी १ लाख ९५ हजार ८०५ रुपयांचे सोने, चांदी व हिरे अशी मालमत्ता जप्त केली आहे.पुणे पोलिसांनी बंगळुरु येथील अश्विनकुमार याच्या घरावर शुक्रवारी छापा घातला होता. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सोने, चांदी व हिऱ्याचे दागिने आढळून आले. या संपूर्ण मालमत्तेची मोजदाद व मुल्यांकन करण्याचे काम शनिवारी दिवसभर सुरु होती.

डाॅ. प्रीतीश देशमुख याच्याअगोदर जी ए सॉफ्टवेअरचे महाराष्ट्रातील कामकाज आश्विनकुमार पाहत होता. त्याने २०१८ मध्ये राज्य परीक्षा परिषदेचा संचालक सुखदेव डेरे याच्याशी संगनमत साधून २०१८ च्या टीईटी गैरव्यवहार केला. त्यात त्यांनी तब्बल ५ कोटी रुपयांची कमाई केल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. पुण्यात सुखदेव डेरेला २१ डिंसेबर रोजी अटक केली असतानाच त्याचवेळी एका पथकाने बंगळुरू येथे आश्विनकुमारला ताब्यात घेतले. त्याला पुण्यात आणून अटक करण्यात आली. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

सोन्याचे घड्याळ आणि चष्माही

अश्विनकुमार याच्यात घरात सोन्याचांदीच्या दागिन्यांबरोबर एक सोन्याचे घड्याळ आणि सोन्याची फ्रेम असलेला चष्माही पोलिसांच्या हाती लागला आहे. एकूणच अश्विनकुमार याला सोन्याची हौस असल्याचे दिसून आले आहे.

अश्विनकुमार याच्या घरी सापडलेली मालमत्ता

एकूण सोन्याचे नग...३९
चांदीचे एकूण नग...१६
एकूण सोने वजन १४८०.६८० ग्राम.
हिरे, जडजवाहीर ४४.७४ कॅरेट
सोन्याची दागिने (हिरे रत्नासह) किंमत...८५, २०, ३२६ रुपये
चांदी एकूण वजन...२७.०२३ किलो
चांदीची किंमत..१६,७५, ४७९ रुपये
सर्व मुद्देमालाची किंमत....१,०१,९५,८०५ रुपये

Post a Comment

Previous Post Next Post