सांगली जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपुन काढलं

 


दैनिक हुपरी समाचार :

सांगली : हिवाळा हंगामात देखील पावसाचा धुमाकूळ दिसून येतोय. काल (बुधवारी) झालेल्या दमदार पावसाने राज्यातील अनेक भागात शेतीचे प्रचंड नुकसान झाले.कालपासून जलमय वातावरण झालं आहे. तर, आज गुरुवारी पहाटेपासून सांगली जिल्ह्याला पावसानं चांगलंच झोडपुन काढलं आहे. या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील मिरज पूर्व, कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस, कडेगाव, इस्लामपूर, वाळवा शिराळ्या सह काही भागात शेतीची  नासधुस झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. तेथील द्राक्षांच्या बागाही  पावसाने डुबल्या आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे.

काल बुधवारी राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने  कहर केला. या पावसाचा मोठा फटका शेतीला  बसला आहे. या कारणाने शेतकरी हबकले आहेत. जिल्ह्यात तर आज पहाटेपासून अवकाळी पावसाने धुडगूस घातला. यामुळे तेथील तालुक्यातील अनेक भागात शेतीचे नुकसान झालं. पावसामुळे ऊसतोडी रखडल्या आहेत, फुलोऱ्यात आलेल्या द्राक्ष बागांच्या हंगामावर पाणी पडले आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे 50 हजार हेक्‍टरवरील द्राक्षबागा बाधित झाल्या होत्या, तर आजही सुमारे 30 हजार हेक्‍टरवरील द्राक्षबागांचे नुकसान झालेय.

सांगलीतील तासगाव, पलूस, मिरज, कडेगाव परिसरात पावसामुळे ओढे, नाले ओसंडून वाहत हेत. द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असून, द्राक्षांचे घड कुजण्याच्या स्थितीत आहे. कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. जोरदार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. दरम्यान, अस्मानी संकटात जिल्ह्यात द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांचे आतापर्यंत दीड हजार कोटी रुपयांचे नुकसान झालेय. बाकी 30 हजार हेक्टर क्षेत्रावरील सुमारे आणखी दीड हजार कोटी रुपयांच्या द्राक्षांवर अवकाळी पावसाचे संकट उभं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post