तब्बल 18 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सांगली बाजार समितीच्या परिसरात घुसलेला गवा पकडण्यात वन विभागाला यश


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

सांगली : एका गवा साठी  तब्बल 18 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सांगली बाजार समितीच्या परिसरात घुसलेला गवा पकडण्यात वन विभागाला यश आले. कोणतीही इजा न करता हा गवा बंदिस्त करण्यात आला. त्यामुळे मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.दरम्यान, या गव्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

सांगली शहराच्या नागरी वस्तीत असणाऱया मार्केट यार्ड परिसरात मंगळवारी पहाटे गवा आढळून आला. गव्याला पकडण्यासाठी या परिसरात जमावबंदी आदेश लागू करून वन विभाग, महसूल आणि पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली. तब्बल 18 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरातील एका अरुंद बोळात गवा आला असताना गल्लीच्या एका बाजूला रेस्क्यू व्हॅन लावण्यात आली, तर या गल्लीचा दुसरा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला. गवा गाडीत जाईल, यादृष्टीने योग्य खबरदारी घेण्यात आली. काही वेळाने हा गवा अलगद गाडीत गेला. कोणतीही इजा अथवा मारहाण न करता अत्यंत सुरक्षितपणे गव्याला पकडण्यात यश आले. गवा पकडल्याचे समजताच मार्केट यार्ड परिसरातील व्यापाऱयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

एका गव्यासाठी तीन जिह्यांतील रेस्क्यू टीम 18 तास झटली

नागरी वस्तीत चुकून आलेला हा गवा बुधवारी वन विभागाने नैसर्गिक अधिवासात नेऊन सोडला. गवा पकडण्यासाठी वनविभागाचे सांगली, कोल्हापूर आणि पुणे येथील रेस्क्यू टीमला सलग 18 तास कसरत करावी लागली. वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱयांना महसूल आणि पोलीस यंत्रणेने मदत केली. त्यामुळे नागरी वस्तीत घुसलेल्या गव्याला सुरक्षित पकडण्यात यश आले.

Post a Comment

Previous Post Next Post