मुलगा असो अथवा मुलगी दोघांनाही २१व्या वर्षांनंतरच आता हळद लागणारदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 यवतमाळ : देशात महिलांसाठी विवाहाचे वय किमान १८ वर्षे, तर पुरुषांसाठी २१ वर्षे होते. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाने महिलांचे लग्नाचे वय १८वरून २१ वर्षे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.त्यामुळे मुलगा असो अथवा मुलगी दोघांनाही २१व्या वर्षांनंतरच आता हळद लागणार आहे. केंद्रीय महिला टास्क फोर्स आणि बालविकास मंत्रालयाच्या शिफारसींच्या आधारे हा निर्णय घेतला आहे. सरकारकडून उर्वरित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याला कायदेशीर मान्यता मिळेल. वयोमर्यादा वाढविल्यानंतर लवकर लग्न करण्यासाठी बळी पडणाऱ्या मुलींना दिलासा मिळेल.

समानतेच्या मार्गावरील महत्त्वाचे पाऊल

सध्याच्या स्थितीत मुलींनीही उच्च शिक्षण घेण्याची गरज आहे. मात्र १८वर्षांनंतर मुलींना लग्नासाठी आग्रह धरला जात होता. यात त्यांचे शिक्षण अर्धवट राहत होते. चांगल्या नोकरीसाठी चांगले शिक्षण आवश्यक आहे. निर्णय योग्य आहे.
- अनिल काकडे

आजही ग्रामीण भागात मुलींची सर्वाधिक लग्न इयत्ता बारावीनंतर होतात. त्यामुळे मुलींचे शिक्षण अपूर्ण राहत होते. पर्यायाने संधी असूनही त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येत नव्हते. या निर्णयामुळे मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढेल.
- भीमराव भगत

शिक्षणाचा डाव अर्ध्यावरच नाही मोडणार

लग्नाचे वर्षे १८ असल्याने अनेक कुटुंबात मुलींचे लग्न लवकर उरकले जात होते. परिणामी अनेक अभ्यासू हुशार मुलींना पुढील शिक्षणापासून वंचित राहावे लागत होते. विशेषत: ग्रामीण भागात मुलींना लवकर लग्नासाठी आग्रह केला जात होता. आता हे वय २१ वर्षे केल्याने मुलींचे शिक्षण अर्ध्यावर सुटणार नाही.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणतात
सरकारने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. यामुळे मुली शिकतील, स्वत:च्या पायावर उभ्या राहतील, नापास झाले की लग्न करून टाका असे घडणार नाही. कुपोषित माताही राहणार नाही.

- सुनील भेले

लग्नाचे वय वाढविल्याने मुलींना करिअर घडविण्याची संधी मिळेल. शहरी भागात हा निर्णय उत्तमच राहील. मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जाणीवजागृती करावी लागणार आहे.
- पुष्पा फाळके

Post a Comment

Previous Post Next Post