भाजी पाल्‍यांचे दर दीडशे-दोनशेच्‍या घरात

सर्वसामान्‍यांच्‍या खिशाला महागाईचा तडका 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

सातारा : पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्‍या दराचे सीमोल्‍लंघन सुरू असतानाच भाजी पाल्‍यांच्‍या दराने रोज उच्‍चांक स्‍थापन करण्‍यास सुरुवात केली आहे.भाजीपाल्‍यांचे दर दीडशे-दोनशेच्‍या घरात जाऊन ठेपल्‍याने सर्वसामान्‍यांच्‍या खिशाला महागाईचा तडका बसत आहे. विविध कारणांमुळे वाढलेले भाजीपाल्‍याचे हे दर कमी होण्‍यास आणखी काही दिवस लागण्‍याची शक्‍यता असल्‍याचे मत शेतकरी व्‍यापारी आणि विक्रेते व्‍यक्‍त करत आहेत.

गेल्‍या काही दिवसांत पेट्रोलचा दर ११० रुपये, तर डिझेलचा दर १०० च्‍या घरात ठाण मांडून बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले असतानाच घरगुती गॅस सिलिंडरने एक हजार रुपयांचा पल्‍ला गाठत सर्वसामान्‍यांचा खिसा मोकळा करण्‍यास सुरुवात केली. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्‍या दरवाढीमुळे कोलमडलेले बजेट सावरण्‍याचा प्रयत्‍न सर्वसामान्‍यांकडून सुरू असतानाच भाजीपाल्‍याने दररोज दराचे उच्‍चांक करण्‍यास सुरुवात केली आहे.

गत १५ दिवसांपासून मंडईत टोमॅटोचा दर १०० च्‍या घरात ठाण मांडून बसला आहे. टोमॅटोपाठोपाठ वांगी, पावटा, फ्‍लॉवर, कोबी, गवारी, भेंडी, दुधी भोपळा, दोडका यांच्‍या दराने शंभरी ओलांडत २०० कडे धाव घेतली. रविवारी सातारा येथील भाजीपाल्‍याचे किरकोळ विक्रीचे दर ऐकून सर्वसामान्‍यांच्‍या तोंडचे पाणी पळाले. मध्‍यंतरीच्‍या काळात झालेला अवकाळी पाऊस, त्‍यानंतर अचानक वाढलेली थंडी, धुक्‍यामुळे पिकावर पडणाऱ्या रोगांत झालेली वाढ, वाढलेले इंधन दर, त्‍यामुळे वाढलेले वाहतुकीचे दर, तोडणी, भरणीचे वाढलेले दर, मजूर कमतरतेमुळे शेतमालाची आवक घटली आहे. आवक घटल्‍याने तसेच गरजेइतका शेतमाल शेतात शिल्‍लक नसल्‍याने मालाचे दर वाढले असून, ते कमी होण्‍यास एक महिन्‍याचा कालावधी लागू शकतो, असे विक्रेते, शेतकरी, व्‍यापारी सांगत आहेत.

डबा नसल्‍याने पालकांची सुटका

कोरोनाच्‍या कारणास्‍तव शाळांचे कामकाज अल्‍पकाळ सुरू असल्‍याने विद्यार्थ्यां‍ना शाळेत डबा आणण्‍यास मनाई करण्‍यात आली आहे. विद्यार्थ्यां‍ना शाळेत डबा द्यायचा नसल्‍याने रोज त्‍यांना डब्‍यात कोणती भाजी द्यायची, याच्‍या कटकटीपासून पालकांची सध्‍यातरी सुटका झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार