जिल्हा परिषदेच्या पार्किंगची व्यवस्था कोलमडली

 छोटे-मोठे अपघात आणि वादावादीचे प्रसंग दररोज घडत आहेत


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : नागाळा पार्कातील जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पार्किंगचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेच्या दारातूनच आरटिओ ऑफिस विवेकानंद कॉलेज तसेच अन्य कार्यालयांकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर नेहमीच गर्दी असते. यातच जिल्हा परिषदेच्या पार्किंगची व्यवस्था कोलमडली असल्याने सर्व वाहने ही रस्त्याच्या दुतर्फा लागत आहेत. त्यामुळे छोटे-मोठे अपघात आणि वादावादीचे प्रसंग दररोज घडत आहेत.

मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात सहाशेपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य आणि त्यांच्यासोबत येणारे कार्यकर्ते, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने नियमितपणे जिल्हा परिषदेत येतात. दररोज हजारोंच्या संख्येने लोक जिल्हा परिषदेला भेट देऊन कामांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करतात. जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या आवारात केवळ अधिकारी, पदाधिकारी यांचीच वाहने पार्किंगची व्यवस्था आहे, तर कागलकर हाऊसच्या बाजूला उर्वरित वाहने पार्किंगची व्यवस्था केली आहे, मात्र येणाऱ्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत हे पार्किंग तोकडे आहे. सध्या चौथ्या मजल्याचे काम सुरू आहे. याचबरोबर कागलकर हाऊस परिसराचा विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर आहे, मात्र या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.

पार्किंग व्यवस्थेसाठी आर्थिक तरतूद

जिल्हा परिषदेच्या कागलकर हाऊस परिसरात मोठ्या प्रमाणात रिकामी जागा आहे. या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करणे शक्य आहे. पार्किंग व्यवस्था करण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे, मात्र कंत्राटदारांकडून हे काम करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. बांधकाम विभागाकडून सूचना देऊनही चालढकल सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या सभेत कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी, सदस्यांकडून होण्याची शक्यता आहे.

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार