थर्टी फर्स्ट सेफ्टी फर्स्ट..

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची तातडीची बैठक घेतलीदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

नवीन वर्षाचे स्वागत करताना थर्टी फर्स्टच्या जल्लोषावर नियंत्रण आणावे लागणार आहे. कारण मुंबईसह राज्यात कोरोना आणि ओमायक्रोन अतिशय वेगाने पसरतो आहे. राज्यात आज दिवसभरात पाच हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.या पार्श्वभमीवर राज्य सरकारने सावधगिरीच्या उपायोजना सुरू केल्या आहेत. सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय आणि लग्न सोहळ्यांत फक्त 50 जणांना उपस्थित राहता येईल. अंत्यसंस्काराला 20पेक्षा अधिक लोकांचा समावेश नसावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर कोरोना संसर्गाची स्थिती पाहून सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कठोर निर्बंध लावण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सची तातडीची बैठक घेतली आणि त्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला.

मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रोन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांत वाढताना दिसत आहे. एक दिवसाआड रुग्णसंख्या दुप्पट होत असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक रद्द करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स बैठक आज घेण्यात आली. या बैठकीस आरोग्य मंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव देवाशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलिस आयुक्त हेमंत नगराळे, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित यांची उपस्थिती. बैठकीच्या सुरुवातीस आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरण करून राज्यातील कोविडच्या सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, टास्क फोर्सच्या बैठकीत निर्बंधांबाबत चर्चा झाली. यावेळी कुठेही लग्न तसेच अन्य कार्यक्रमांसाठी हॉलमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी काटेकोर उपाययोजना करण्याबाबत निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून निश्चितच योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे राज्यातील बेडची संख्या, उपलब्ध औषधी याविषयीही चर्चा झाली असून सध्या उपलब्ध असलेल्या पेरिवीर औषधांचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे टोपे म्हणाले.

कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांना प्राधान्य

लसीकरणात 90 टक्क्यांदरम्यान लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर 57 टक्क्यांदरम्यान लोकांचे दोन्ही डोस झाले आहेत. ज्या जिल्ह्यांत कमी लसीकरण झाले आहे त्या जिल्ह्यांत लसीकरण करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसांत यासंदर्भात प्रशासनाची बैठक होणार असून व्हॅक्सिनेशनमध्ये कमी असलेले जिल्हे स्टेट अॅव्हरजेवर आणण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे टोपे म्हणाले.

मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट टक्के

राज्यात कोरोनाचा मुंबई, ठाणे, पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट वाढत आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्यांवर पोहोचला आहे. एक दिवसात दुप्पट होणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय उपाय करावेत, काय निर्बंध लादणे गरजेचे आहे याबाबत चर्चा झाली. यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.

जानेवारीपर्यंत जमावबंदी

पोलीस आयुक्तांनी मुंबईत 7 जानेवारीपर्यंत कलम 144 अर्थात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. रेस्टॉरंट, हॉटेल, बार, पब, रिसॉर्ट आणि क्लब येथील नववर्ष स्वागताच्या पाटर्य़ांवर पोलिसांनी बंदी आणली आहे. अशा पाटर्य़ांवर पोलिसांचा वॉच राहणार असून नियम भंग करणाऱयांवर कडक कारवाई करण्यात येईल.

पर्यटन स्थळे , बगिचा , चौपाटय़ा येथील गर्दी कमी करण्यासाठी तेथेही जमावबंदीचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत .

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार