कोल्हापूर जिल्हा बँकेची सत्ता मिळवण्याची काही लोकांची राक्षसी महत्त्वाकांक्षा

खासदार  संजय मंडलिक यांच्यावर दबाव आणून त्यांना ओढत नेले....ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ 


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेची सत्ता मिळवण्याची काही लोकांची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. खासदार  संजय मंडलिक यांच्यावर दबाव आणून त्यांना ओढत नेले. त्यामुळे ते आमच्याबद्दल बोलत आहेत.बाकी त्यांच्या मनात काहीही नाही, असा निर्वाळा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल दिला. विरोधी पॅनेल मध्येही भाजपचे शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील उपस्थित होते.

ग्रामविकासमंत्री मुश्रीफ म्हणाले, ''जिल्हा बॅंकेत सत्तारूढ आघाडीची सत्ता येईल. शेतकऱ्यांना सध्या दिल्या जाणाऱ्या पीककर्जात वाढ करून एकरी ६० हजार देण्याचे नियोजन केले जाईल. कृषी कर्ज व्याज कमी करणे, मध्यम मुदत, खावटी कर्जावरील व्याजही कमी केले जाईल. दोन वर्षांत दहा हजार कोटी ठेवी करणे व २०० कोटींचा नफा करणे उद्दिष्ट आहे. चुकीचे राजकारण करतो म्हणून टीका करतात तर मग आमच्यासोबत त्यांना कशासाठी यायचे आहे हाही सवाल आहे. आता टीका करण्याऐवजी बॅंकेच्या प्रगतीची चर्चा केली पाहिजे.''

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ''या निवडणुकीत शिवसेनेला डावलले नव्हते. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्यानंतर स्थानिकच्या काही तडजोडी होत्या. जिल्ह्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही शिवसेनेला सोबतच घेवून जात आहे. यात कोणताही दुजाभाव केलेला नाही.''

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ''प्रचारासाठी गावोगावी जाताना असे लक्षात आले की विरोधकांनी पॅनेल करण्याची गरज नाही. कारण सत्तारूढ पॅनेल एकतर्फी विजयी होणार आहे. लोकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. सर्वच सर्व जागा जिंकून लोक हे सिध्द करुन दाखवू.''

यावेळी, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे, राजेश लाटकर उपस्थित होते.

देवणे यांना आव्हान

भाजपच्या वतीने आमदार विनय कोरे व आमदार प्रकाश आवाडे यांचे अर्ज आल्यानंतर इतर इच्छुकांचे अर्ज मागे घेतले. जिल्हा बॅंकेच्या कामावर कोणतीही टिपणी केली नाही. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले पाहिजे, असेही मुश्रीफ यांनी नमूद केले. ईडीची चौकशी सुरू आहे म्हणून मुश्रीफांनी मिळतेजुळत घेतले म्हणणाऱ्या विजय देवणे यांनी आमच्याबद्दल आणखी काही माहिती असेल तर जाहीर करावे, असे आव्हानही दिले.

Post a Comment

Previous Post Next Post