आम्ही मागून मिळाले नाही ते जिंकून घेऊन दाखवले..

 शिवसेना आघाडीचे पॅनेल प्रमुख खासदार संजय मंडलिक


दैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर : तीन जागा दिल्या असत्या तर जिल्हा बँक बिनविरोध झाली असती पण सत्तारुढ गटाने आम्हाला लढायला लावले, आम्ही मागून मिळाले नाही ते जिंकून घेऊन दाखवले, अशी रोखठोक प्रतिक्रिया जिल्हा बँकेतील विरोधी शिवसेना आघाडीचे पॅनेल प्रमुख खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केली जनतेच्या ताकदीवर आम्ही जिंकून दाखवले आहे, आता शिवसेनाच बँकेच्या सत्ताकारणात किंगमेकर असेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


महाभारतात कौरवांनी सुईच्या टोका एवढी देखील जमिन देणार नाही असे सांगत पांडवावर युध्द लादले, पण पांडवांनी हस्तीनापूरमध्ये काय केले आणि महाभारत कसे घडले हे जनतेला माहीत आहे याचे उदाहरण देऊन खासदार मंडलीक यांनी कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याचे सांगितले.

बँकेच्या निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने आता अध्यक्षपदाच्या शर्यतीत अजून नसलो तरी मातोश्रीचा जो आदेश येईल त्याप्रमाणे भूमिका राहिल असे सांगितले. बँकेच्या सत्ताकारणात शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत आहे. अनेक जण आतापासूनच संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले. मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवसेना आघाडीसोबत राहणार असल्याची भूमिका घेतली आहे, त्याप्रमाणे गेल्या सहा वर्षात संचालक म्हणून माझ्या संपर्कात असलेले देखील आताही संपर्कात येत आहेत, असे सांगितले. यामुळे आता अध्यक्षपदासाठीचे लॉबींग सुरु झाले आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र स्थानिक राजकारणातून एकमेकांच्या उमेदवारीला झालेला विरोध, जागा वाटपात न झालेली तडजोड यामुळे अखेर निवडणूक लागली. शिवसेनेने विरोधी पॅनेल उभा करत सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे केले. तर भाजपने सत्ताधाऱ्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे या निवडणुकीला रंगत आली होती.

Post a Comment

Previous Post Next Post