पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने मुक्त वातावरणात रमलेली पोरं 'घरकोंबडी' झाली

 


दैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर : कोरोना, ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवून ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दीड वर्षानंतर शिक्षण पूर्वपदावर येत होते. मात्र, पुन्हा ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्याने मुक्त वातावरणात रमलेली पोरं 'घरकोंबडी' झाली आहेत. ऑफलाईन वर्ग पुन्हा सुरू करण्याची मागणी विद्यार्थी, पालकांतून होत आहे.
कोरोना मुळे गेल्या दोन वर्षांमध्ये शिक्षण क्षेत्राची घडी विस्कटली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू झाले. ऑनलाईन विश्वातून बाहेर पडून मुले-मुली या मुक्त वातावरणा मध्ये रमली. त्यातच आता पुन्हा शाळा, महाविद्यालये बंद झाल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे.

शाळा पुन्हा सुरू करा

ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शाळा पुन्हा ऑफलाईन पद्धतीने सुरू कराव्यात, या मागणीसाठी राज्यभर मोहीम सुरू झाली आहे. कोरोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यास शासनाने त्वरित परवानगी द्यावी, अशी मागणी खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी गुरुवारी केली.

गुरुजींची शाळा सुरूच

ऑफलाईन वर्ग बंद असले, तरी शिक्षकांनी दैनंदिन आणि प्रशासकीय कामकाज, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थी नसले, तरी शिक्षकांना शाळा, महाविद्यालयात जावे लागत आहे.

ऑनलाईनचा कंटाळा आला!

आता कुठे आम्हाला शाळेची गोडी लागली होती. त्यातच पुन्हा शाळा बंद झाल्याने खूप वाईट वाटत आहे. शाळा सुरू कराव्यात.- शर्वरी कोळी, गंगावेश

मोबाईलवरील ऑनलाईन शिक्षण समजत नाही. त्यात लक्ष लागत नाही. शाळा परत सुरू व्हाव्यात. - स्वरा कांबळे, सोनाळी,

पालक काय म्हणतात?

मला दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे. मुली इयत्ता चौथीला, तर मुलगा इयत्ता पहिलीमध्ये आहे. ऑनलाईन शिक्षण त्यांना समजत नाही. शाळा बंद असल्याने सर्व मुलांची अवस्था एक प्रकारे घरकोंबड्यांसारखी झाली आहे. शासनाने शाळा लवकर सुरू कराव्यात. 

- सागर शेलार

माझा मुलगा इयत्ता पहिलीमध्ये आहे. शिक्षणाची त्याची सुरुवात आहे. त्याला ऑनलाईन पद्धतीने शिक्षण काय समजणार, हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शाळा पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे.

 - प्रवीण वारके

Comments

Popular posts from this blog

10 वीचे वर्ग मित्र व्हॉट्सॲप माध्यमातून 30 वर्ष एकमेकांपासून दुरावलेले मित्र एकत्र

रविराज जामकर व कार्यकर्ते यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये मा.दौलतराव पाटील आण्णा यांच्या प्रमुख उपस्थितत जाहीर प्रवेश

भुयेवाडीत गव्याला हाकलणाऱ्या तरुणावर हल्ला करताच तो जागीच ठार