प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली.

 शहरातील नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत....


दैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर : शहरातील नाल्यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला कारणे दाखवा नोटीस पाठवली. यात नदीत सांडपाणी मिसळत असल्याचे सांगितले असून, याबाबत १४ दिवसांत खुलासा करावा.असे निर्देश देण्यात आले आहेत. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यालाही याबाबत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

पंचगंगा नदीपात्रात राजाराम बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात मासे मेले होते. प्रजासत्ताक संस्थेने याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर नदीकाठाने पाहणी केली. यात सहा नाले वेगवेगळ्या ठिकाणी थेट नदीत मिसळत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत महापालिकेला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. कारणे दाखवा नोटीसमध्ये सांडपाणी मिसळत असल्याचा ठपका महापालिकेवर ठेवण्यात आला आहे. पाहणीत पंचगंगा घाट, दुधाळी नाला, जामदार नाला, सीपीआर नाला, कसबा बावडा नाला, शुगर मिल नाल्यातील सांडपाणी (प्रक्रिया न केलेले) थेट नदीत मिसळते, तसेच या पाण्यात शहरी घनकचऱ्याचे घटकही आढळून आले आहेत. हे प्रदूषण नियंत्रण कायद्याचे उल्लंघन आहे. याबाबत १४ दिवसांत खुलासा करावा, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

औद्योगिक पाणी नदीत

कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याचे औद्योगिक सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी काही दिवसांपूर्वी फुटली. हे औद्योगिक सांडपाणी जवळील नाल्यात आले. नाल्यातून हे पाणी थेट नदीत गेले. यामुळे नदीतील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. त्यातून मासे मृत झाले. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर येऊन पाहणी केली. यावेळी पुढील चार तासांत त्यांनी जलवाहिनी दुरुस्त करू, असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी ती नीट केली. मात्र, या औद्योगिक सांडपाण्यामुळे मासे मृत झाले, असा प्राथमिक अंदाज असल्याने कारखान्याला नोटीस बजावली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post