सगळे मिळून कोकणचा काया पालट करु..उपमुख्यमंत्री अजित पवार


दैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात जाऊन जोरदार टोलेबाजी केली होती. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करताना अजित पवार यांनी मतदारांना विचारपूर्वक मतदान करण्याचं आवाहन केलं.संस्था उभ्या करायला अक्कल लागते, मात्र, संस्था अडचणीत आणायला अक्कल लागत नाही असं म्हणत त्यांनी राणेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत नारायण राणेंच्या भाजपा प्रणित सिद्धिविनायक पॅनलनं मोठा विजय मिळवत ११ संचालक निवडून आणले.

त्यानंतर खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी खोचक प्रतिक्रिया देत राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. यासोबतच, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांच्यावर देखील टीका केली होती. अर्थखात्याचे मंत्री येतात आणि तिन्ही पक्षांचा पराभव करून परत जातात. त्याला अक्कल म्हणतात. विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे", असं म्हणत खोचक शब्दात नारायण राणेंनी टोला लगावला होता. त्यावर आता अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या लोकांनी प्रयत्न केला. पण दुर्दैवाने यश आले नाही. ज्यांना यश आले आहे त्यांचे अभिनंदन. त्यांनी चांगली बॅंक चालवावी अशा आमच्या शुभेच्छा आहेत. नारायण राणेही अनेक वर्षे मंत्रीमंडळात होते. तौते, निसर्ग चक्रीवादळ आले त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी मदत केली. रत्नागिरी येथे मोठ्या बंधाऱ्याच्या बांधकामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ज्या ज्या गोष्टी कोकणात करायला पाहिजेत त्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकमेकांची उणी दुणी काढण्यापेक्षा ते केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या परीने निधी आणावा आम्ही आमच्या पद्धतीने राज्यातून निधी देऊ. सगळे मिळून कोकणचा कायापालट करु," असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अर्थमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंवर अप्रत्यक्ष शब्दांत निशाणा साधला होता. "सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. काही महाभागांनी कर्ज कसं मिळवलं, कसं थकवलं हे पाहा. कुणाच्याही दबावाला, दहशतीला बळी पडू नका. विचारपूर्वक मतदान करा," असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर नारायण राणेंनी देखील प्रत्युत्तर दिलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post