महागाईने लोकांचा खिसा रिकामा होत असताना आता रेल्वेनेही झटका दिला

 


दैनिक हुपरी समाचार :

मुंबई : नवीन वर्ष नुकतेच सुरू झाले आहे. या वर्षात महागाई कमी झालेली नाही. इंधनाचे भाव वाढलेलेच आहेत. तर अन्य वस्तूंचेही भाव वाढले आहेत. अशा परिस्थितीत लोकांचा खिसा रिकामा होत असताना आता रेल्वेनेही झटका दिला आहे.आपण प्रत्येक जण कधी ना कधी रेल्वेचा प्रवास करतोच, त्यामुळे ही बातमी महत्वाची आहे. लवकरच तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर 50 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. खरेतर, रेल्वे मंत्रालयाने विमानतळांच्या धर्तीवर विकसित केलेल्या रेल्वे स्टेशनवर स्टेशन विकास शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे शुल्क प्रवाशांना यूजर चार्ज म्हणून भरावे लागणार आहे.

विमानतळाच्या धर्तीवर नव्या रेल्वे स्टेशनवर प्रवाशांकडून युजर चार्जेस घेतले जाणार आहेत. हे शुल्क 10 ते 50 रुपये असेल. तुम्हाला सांगतो की, रेल्वे देशभरातील 400 रेल्वे स्टेशनना जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज बनवण्याचे काम करत आहे. यातील बहुतांश रेल्वे स्टेशन सार्वजनिक-खासगी भागीदारीवर आहेत. रेल्वे बोर्डाने युजर चार्जेसना मान्यता दिली आहे. वेगवेगळ्या वर्गात प्रवास करणाऱ्या लोकांसाठीही शुल्क वेगवेगळे असेल आणि तिकिटातच त्याचा समावेश असेल. रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार, 10 रुपये ते कमाल 50 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल.

साध्या तिकिटांवर प्रवास करणाऱ्यांसाठी हे शुल्क 10 रुपये असेल. त्याच वेळी, स्लीपरमध्ये प्रवास करणाऱ्यांना 25 रुपये आणि एसीमध्ये प्रवास करणाऱ्यांना 50 रुपये अतिरिक्त वापरकर्ता शुल्क आकारले जाईल. सध्या या प्रकारचे शुल्क देशातील विमानतळावरच आकारले जाते.

मात्र, रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे सेवा शुल्क कधीपासून लागू होणार, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करणाऱ्यांना सेवा शुल्क म्हणून 10 रुपये द्यावे लागतील. विमानतळा प्रमाणे विकसित झालेल्या स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांकडून निश्चित किंमतीच्या 50 टक्के शुल्क आकारले जाईल.

Post a Comment

Previous Post Next Post