वर्षानुवर्षे थकीत असलेल्या बडय़ा संस्थांच्या वसुलीसाठी पथक तयार करण्यात आलेदैनिक हुपरी समाचार वृत्तसेवा :

 सांगली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची थकबाकी दिवसें दिवस वाढत चालली असून, एनपीए 650 कोटींवर पोहोचला आहे. नाबार्डने काही दिवसांपूर्वी बँकेचा एनपीए कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बाबत बँकेने गंभीर दखल घेत थकबाकी कमी करून बँक आर्थिक भक्कम करण्यासाठी पावले उचलली आहेत.वर्षानुवर्षे थकीत असलेल्या बडय़ा संस्थांच्या वसुलीसाठी सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करण्यात आले आहे. मार्च पर्यंत थकबाकी कमी करण्यासाठी पथकाचा प्रयत्न राहणार आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एनपीएमध्ये गेल्या काही वर्षांपासून भर पडत असून, ही रक्कम वाढतच आहे. सध्या हा आकडा 650 कोटींवर गेला आहे. या थकबाकीमध्ये आमदार, खासदार यांच्यासह बडय़ा संस्थांचा समावेश आहे. वाढत्या एनपीएमुळे बँकेचे आर्थिक गणित अडचणीत येत आहे. नाबार्डनेही ऑडिट अहवालामध्ये आक्षेप घेत एनपीए वसुलीबाबत बँकेला सूचना केल्या आहेत. बँक प्रशासनानेही याबाबत गांभीर्याने घेतले असून, नूतन संचालक मंडळाच्या बैठकीमध्येही वसुलीबाबत कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बँकेने टॉप थर्टी संस्थांकडील वसुली करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहेत. बँकेचे सरव्यवस्थापक व्ही. एम. रामदुर्ग यांच्या नेतृत्वा खालील पथक वसुलीसाठी नियुक्त केले आहे. मार्च अखेरपर्यंत जास्तीत जास्त वसुली करण्याचे आव्हान या पथकासमोर असणार आहे.

बँकेने चुकीच्या पद्धतीने बडय़ांच्या संस्थांना कर्जाचे वाटप केले आहे. संबंधित संस्था चालकांच्या चुकांमुळे सध्या या संस्था बंद आहेत. बँकेने या संस्था ताब्यात घेतल्या असल्या तरी या संस्थांकडे थकबाकीचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे या संस्था लिलाव करून थकबाकी वसुली करण्याबाबत बँकेने निर्णय घेतला आहे. मात्र, बडय़ांच्या संस्था असल्याने यापूर्वी कर्ज वसुली करताना अडचणीच आल्या आहेत. मात्र, नाबार्डने वाढत्या एनपीएबाबत बँकेला केलेल्या सूचना नूतन संचालक मंडळाने गांभीर्याने घेतल्या आहेत. संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार स्वतंत्र पथकामार्फत वसुलीच कार्यवाही केली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post