प्रसिध्द डिझायनर दिग्विजय खाडे यांनी बनविले हुपरी नगरपरिषदेचे बोधचिन्ह.हुपरी समाचार :

हुपरी (वार्ताहर) : 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी हुपरी नगरपरिषदेच्या बोधचिन्हाचे हुपरी नगरपरिषदेच्या वतीने अनावरण करणेत आले. हुपरी नगरीच्या प्रथम नागरीक, नगराध्यक्षा सौ.जयश्री महावीर गाट यांचे हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण करणेत आले.

हुपरी ही कलारसिकांची नगरी आहे. या नगरीला चांदी उद्योगाबरोबरच कलेची थोर परंपरा आहे. हुपरी नगरपरिषद स्थापनेला चार वर्षे झाली. हुपरी नगरपरिषदेची खास ओळख म्हणून बोधचिन्ह असणे गरजेचे होते. यासाठी हुपरी नगरपरिषदेच्या वतीने बोधचिन्ह स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये दिग्विजय खाडे यांनी तयार केलेली कलाकृती अव्वल ठरली आहे. बोधचिन्हामध्ये हुपरी नगरीच्या औद्योगिक, कला, आध्यात्मिक परंपरेची ओळख करून देणे आवश्यक होते. हे आव्हान हुपरी परिसर व जिल्ह्यातील नामांकित ग्राफिक डिझायनर दिग्विजय खाडे यांनी लिलया पेलले असून त्यांनी हुपरीची सांस्कृतिक औद्योगिक परंपरा दर्शविणारे सुंदर बोधचिन्ह तयार केले आहे.

याविषयी बोलताना ते म्हणाले की, गेल्या १५ वर्षांपासून जाहिरात व कला क्षेत्रातील कामाचा अनुभव हा लोगो तयार करताना आलेला आहे. आपल्या रजतनगरीचा लोगो तयार करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्यच समजतो. या लोगोमध्ये हुपरीची आध्यात्मिक परंपरा दर्शविणाऱ्या दिपमाळा, सोने-चांदी उद्योगाचे प्रतिक असणारे उद्योगचक्र, दागिने,तसेच  कारखानदारी दर्शविणारी चिन्हे दाखविण्याचा प्रयत्न केला असून रजतनगरीला निरंतर आशिर्वाद देणारा श्री अंबाबाई देवीचा वरदहस्त दर्शविला आहे. या सुंदर डिझाईनसोबत हुपरी नगरपरिषदेचा सेवा-संस्कृती-प्रगती असा संदेशही दिलेला आहे.

बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमास उपनगराध्यक्षा सौ.लक्ष्मी साळोखे, मुख्याधिकारी सौ. स्नेहलता कुंभार, नगरसेवक रफिक मुल्ला, जयकुमार माळगे, सुरज बेडगे, गणेश वाईंगडे, मनोहर सुतार, सुभाष कागले, नगरसेविका सौ.अनिता मधाळे, सौ.पूनम पाटील, सौ.शितल कांबळे तसेच पं.स.सदस्य किरण कांबळे आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post