बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे महानगरपालिका राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून जाणार


दैनिक हुपरी समाचार :

 कोल्हापूर : बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे महानगरपालिका राजकारणाचा चेहरा मोहराच बदलून जाणार आहे. नव्या प्रभाग रचनेमुळे काही जणांचा अपवाद सोडल्यास अपक्षांना निवडून येण्याची संधी फार कमी दिसते.त्यामुळे शहरातील पक्षीय राजकारणाला पूरक अशी परिस्थिती आहे. पहिल्यांदाच बनवलेल्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे आगामी निवडणूक रंगतदार होईल. पूर्वी एक प्रभाग हा तीन ते पाच हजार लोकसंख्येचा होता.

त्यामुळे विजयाची काही समीकरणे पक्की झाली होती. गठ्ठा मतदानाची बेगमी झाली, की विजय निश्चित असायचा. परिसरातील मंडळे, महिला बचत गट, तालमी यांना सांभाळले की राजकारण करता येत होते. त्यातून शहरात अपक्ष नगरसेवकांची संख्या वाढत गेली. ही संख्या इतकी वाढली, की महापालिकेची निवडणूक पक्षाला डावलून आघाड्यांत होऊ लागली. त्यातूनच ताराराणी आघाडीचा प्रयोग झाला. सहा ते अडीच महिन्यांचे महापौर बनले.

२०१० ला महापालिकेत पक्षीय राजकारणाला सुरुवात झाली. तरीही काही अपक्ष निवडून यायचे आणि पदाधिकारी निवडीवेळी आपले उपद्रवमूल्य दाखवायचे. बहुसदस्यीय प्रभागांचा विस्तार पाहता अपक्ष उमेदवारांना निवडून येणे अवघड आहे. अपक्ष उमेदवाराचा प्रभाव त्याच्या परिसरापुरताच असतो. मात्र विस्तारलेल्या प्रभागात त्याला अन्य प्रभागातूनही मते मिळवावी लागणार असून ते अवघड आहे. त्यामुळे या टोकाच्या स्पर्धेत अपक्षांचा टिकाव लागणे अवघड आहे. इच्छुकांना आता कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या वळचळणीला गेल्याशिवाय पर्याय नाही.

निष्ठावंतांना संधी

पक्षीय पातळीवर निवडणूक झाल्याने काही प्रभागात निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळू शकते. एखाद्या कार्यकर्त्याकडे आर्थिक रसद नसली तरी त्या भागात त्याच्याबद्दल सहानुभूती बाळगणारा वर्ग असेल तर त्याला संधी मिळू शकते. त्याला निवडून आणण्यासाठी त्या प्रभागातील मातब्बर नेते प्रयत्न करू शकतात. अशा प्रकारे पक्षीय नगरसेवक वाढवण्यावर सर्वांचा भर असेल.

बहुसदस्यीय प्रभाग रचनेत...

  • मतदाराला तीन उमेदवारांना मतदान करायचे असल्याने प्रचार करताना पक्षाच्या तिघांना एकत्रित प्रचार करावा लागेल.

  • विकासाचे मुद्दे मांडावे लागतील.

  • एकत्रित असल्याने पदाधिकारी निवडीत पक्षाविरोधात जाण्याचे प्रमाणही कमी होईल.

  • निवडणुकीत पक्षीय राजकारणाला बळ मिळणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post