जागा नसेल तर ती उपलब्‍ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाने काय केले ?


दैनिक हुपरी समाचार :

 कोल्‍हापूर : ग्रामीण भागासाठी ३० हजार लोकसंख्येमागे १ प्राथमिक आरोग्य केंद्र आवश्यक आहे. २०२१ च्या लोकसंख्येचा विचार करता अजूनही २९ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज असून त्याला यापूर्वीच मंजुरीही दिली आहे; मात्र यातील १० आरोग्य केंद्रांसाठी जागाच नसल्याने त्यांचे बांधकाम झालेले नाही.महत्त्‍वा‍चे म्‍हणजे काही पीएचसींना तर १९९७ ला म्‍हणजेच २५ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे.

केवळ, जागा नाही एवढेच कारण आरोग्य विभागाकडून सांगण्यात येते. मग जागा नसेल तर ती उपलब्‍ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनाने काय केले ? अन्य गावात या आरोग्य संस्‍थांची उभारणी का केली नाही? असे अनेक प्रश्‍‍न उपस्थित आहेत.

दोन वर्षापासून आलेले कोरोनाचे संकट, त्याच्याशी सामना करताना प्रशासनाची व आरोग्य विभागाची झालेली दमछाक, याचबरोबर महापुराच्या काळात तयार होणारे आरोग्याचे प्रश्‍‍न, साथीचे रोग याचा विचार करता सक्षम आरोग्य यंत्रणेचे महत्त्‍‍व अधोरेखित झाले आहे. यासाठीच आरोग्यच्या पायाभूत सुविधा भक्‍कम असणे आवश्यक आहे.

आरोग्य विभागाच्या नियमानुसार ज्या गावात ही पीएचसी मंजूर झाली आहे, त्याच ठिकाणी बांधकाम अपेक्षित आहे. आरोग्य केंद्र उभारणी तसेच कर्मचारी क्‍वार्टर्स यासाठी किमान ३ ते ५ एकर जागेची गरज आहे. ही जागा जिल्‍हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे असणे बंधनकारक आहे. मात्र या १० गावांना मुबलक जागा मिळालेली नाही. याच परिसरातील अन्य गावात ज्या ठिकाणी जागा उपलब्‍ध आहे, अशा ठिकाणी आरोग्य केंद्र बांधणे आवश्यक आहे.

जागेसाठी रखडल्या १० पीएचसी

तिल्‍लारी (चंदगड), अत्याळ (गडहिंग्‍लज ), हमिदवाडा, कुरुकली, बाचणी (कागल), वाशी, कोगे, हळदी, सडोली खालसा (ता. करवीर), कोलिक (पन्‍हाळा). या १० प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी झाली तर ३ लाख लोकांची सोय होणार आहे. तसेच घाटकरवाडी, शेळप (आजरा) कोलिक (चंदगड), कापशी, बेलवळे खुर्द (कागल), काटेभोगाव (पन्‍हाळा), शिरगाव, या उपकेंद्रांची उभारणीही जागेअभावी रखडली आहे.

दृष्‍टिक्षेपात

  • सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र - ७६

  • उपकेंद्र - ४१३

  • भार - ३० लाख लोकांपेक्षा अधिक

  • लोकसंख्येनुसार आणखी आरोग्य केंद्रांची गरज - १०५

  • उर्वरित आरोग्य केंद्रांना मंजुरी - २९

सध्याच्या लोकसंख्येचा विचार करता १०५ प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज आहे. सध्या ७६ कार्यरत असून २९ पीएचसींना मंजुरी दिली आहे. यातील १९ आरोग्य केंद्रांपैकी काहींची कामे सुरू आहेत. काहींचे बांधकाम झाले आहे. काही निविदा प्रक्रियेत आहेत. मात्र १० आरोग्य केंद्रांना जागाच नसल्याने त्यांची पुढील कार्यवाही थांबली आहे. लवकरच निर्णय घेतला जाईल.

- डॉ. योगेश साळे,जिल्‍हा आरोग्य अधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post