गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे कोल्हापूरशी एक भावनिक नाते होते..

 

दैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे कोल्हापूरशी एक भावनिक नाते होते.लतादीदींची कर्मभूमी जरी मुंबई असली तरी जयप्रभा स्टुडिओ व पन्हाळ्यातील बंगला यामुळे त्यांचे लहानपण बहुतांशी वास्तव्य कोल्हापुरातच गेले.  कोल्हापुरात लतादीदी साडी, दागिने, खाण्याचे पदार्थ खरेदीची हौस पूर्ण करणारी काही खास ठिकाणे होती. मुंबई मुक्कामी पेढे खाण्याची किंवा चुरमुरे खाण्याची इच्छा झाली की कोल्हापूरला निरोप पाठवून लतादीदी पार्सल मागवून घ्यायच्या. लतादीदींचे स्नेही श्रीकांत डिग्रजकर यांनी त्यांच्या आठवणींनी उजाळा दिला आहे.

मुंबई मुक्कामी पेढे खाण्याची किंवा चुरमुरे खाण्याची इच्छा झाली की कोल्हापूरला निरोप पाठवून पार्सल लतादीदी मागवून घ्यायच्या.

वर्षातून दोन साड्या याच दुकानातून खरेदी करत

लतादीदींना कोल्हापूरातून साडी खरेदी करणे फार आवडत होते. त्या विशेषत: पांढऱ्याशुभ्र, दुधी, क्रिम अशा रंगांच्या साड्यांना पसंती देत. बहुधा त्यांच्या आवडीचे हे रंग असावेत. कोल्हापुरातील (kolhapur) महादवार रोडवरील पोरे ब्रदर्स यांच्या साडी दुकानात लतादीदींची हमखास साडीची खरेदी ठरलेली असयाची. त्याकाळात वर्षातून दोन साड्या त्या घ्यायच्या. पुढे संगीत क्षेत्रात गायिका म्हणून स्थिरावल्यानंतरही साडी खरेदीसाठी त्या कोल्हापुरातच येत होत्या. पोरे ब्रदर्सनंतर स्टेशनरोडवरील इंगळे साडी हाऊस हेदेखील त्यांच्या साडी खरेदीचे केंद्र बनले. सुती, सिल्क, अंबरपॉलिस्टर यासोबत कॉटन चंदेरी, इंदोरी या प्रकारातील साड्या त्यांना आवडत होत्या.

माईं कडूनच लतादीदींना जेवणाचा डबा

चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी दीदी भोजे यांच्या हुपरी ऑर्नामेंट या पेढीवर जात असत. भोजे म्हणजे भालजी पेंढारकर यांच्या पत्नी बकुळा म्हणजे माई पेंढारकर यांचे भाचे. कोल्हापुरात जयप्रभा मुक्कामात लतादीदींसाठी माईंकडूनच जेवणाचा डबा यायचा. लतादीदींच्या त्या बकुळामावशी. मुंबईतून कोल्हापूरला यायचे ठरले की लतादीदी बकुळामावशींनाच पत्र लिहून कळवायच्या. अशा कित्येक पत्रांचा संग्रह आजही कोल्हापुरातील श्रीकांत डिग्रजकर यांच्याकडे आहे. बकुळामावशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी लतादीदींचा खास स्नेह असल्याने दीदी दागिन्यांसह चांदीच्या समया, आरतीचे तबक, निरंजने अशा पूजासाहित्याची खरेदी भोजे यांच्या हुपरी ऑर्नामेंटमधूनच करत. बांगडय़ा घालण्याचीही दीदींना खूप आवड होती.

महाद्वार रोडवरील बांगड्यांची आवड भारी

अंबाबाई मंदिरातील महाद्वारला लागूनच असलेल्या माहेर ब्ँगल्समधून बांगड्या भरल्याशिवाय दीदी कधीच कोल्हापूर सोडायच्या नाहीत. माहेर ब्ँगल्स या दुकानात साठच्या दशकातील दीदींचे बांगड्या भरतानाचे फोटो आजही त्या क्षणांच्या आठवणीची साक्ष देतात. तिथूनच पुढे महाद्वार चौकातील दुकानांच्या ओळीतलं दुसरंच दुकान म्हणजे दगडू बाळा भोसले यांनी बनवलेल्या पेढ्यांचे. अंबाबाईचे दर्शन झाले की लतादीदींना याच दुकानातील पेढे लागायचे.

Post a Comment

Previous Post Next Post