२१ कोटी चा थकीत घरफाळा बड्या आसामींचा..दैनिक हुपरी समाचार :

कोल्हापूर : शहरातील ५० जणांनी महापालिकेचा सुमारे २१ कोटी ३७ लाख ५३ हजार ५७६ रुपयांचा घरफाळा थकवला आहे. यामध्ये काही बड्या आसामीं सह, बँका, वित्तीय संस्था, शिक्षण संस्थांचाही समावेश आहे.महापालिकेची एकूण थकबाकी ३५ कोटी रुपयांची असून, त्यातील २१ कोटी या बड्या आसामींची आहेत. प्रशासनाने ही रक्कम वसूल केली तर उर्वरित थकबाकी वसूल होणे अवघड नाही

जकात, एल.बी.टी. रद्द झाल्यानंतर घरफाळा आणि पाणीपट्टी हेच महापालिका उत्पन्नाचे मुख्यस्त्रोत आहेत. मात्र, तरीही घरफाळा वसुलीसाठी प्रशासनाकडून अद्याप युद्धपातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. २०२०-२१ या आर्थिक वर्षातील घरफाळ्याचा आढावा घेतला असता महापालिकेला ८५ कोटी रुपयांचा घरफाळा जमा होणे अपेक्षित आहे. त्यातील ५१ कोटी वसूल झाले असून, ३५ कोटी रुपयांच्या घरफाळ्याची वसुली अद्याप बाकी आहे. घरफाळा थकवणाऱ्यांची एक यादी महापालिकेकडे आहे. यामध्ये ५० मिळकतधारक आहेत. त्यांनी सुमारे २१ कोटी ३७ लाख ५३ हजार ५७६ रुपयांचा घरफाळा थकवला. यामध्ये काही बडे व्यावसायिक, डॉक्टर, शिक्षण संस्था, दवाखाने यांचा समावेश आहे. काही मिळकतधारक राजकीय छत्रछायेखाली असल्याचे यादीवर नजर टाकले की लक्षात येते. यांच्याकडे तगादा लावून थकलेला घरफाळा वसूल करणे गरजेचे आहे. ३५ कोटींच्या थकबाकीतून २१ कोटी वगळल्यास केवळ १४ कोटींचा थकलेला घरफाळा सामान्य माणसांचा आहे. त्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन कठोर पावले उचलून वसुली करण्याची गरज आहे.

३० हजार मिळकतधारकांना पाठवली नोटीस

चालू आर्थिक वर्षातील घरफाळा वसूल करण्यासाठी महापालिकेने ३० हजार मिळकतधारकांना नोटीस पाठवली आहे. त्यांना मार्चअखेर घरफाळा भरावा लागेल; अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

काहीजण न्यायालयात

या ५० थकबाकीदारांपैकी काहीजण न्यायालयात गेले आहेत. घरफाळ्याची चुकीची आकारणी केली असल्याचा त्यांचा आक्षेप आहे. ही प्रकरणे प्रलंबित असल्याने वसुली रखडली आहे. यातून प्रशासकांनी तोडगा काढण्याची गरज आहे.

घरफाळा हे महापालिकेचे महत्त्वाचे उत्पन्न आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील सर्व मिळकतींचे सर्वेक्षण करून कायदेशीर मिळकतकर आकारणी केली तर महापालिकेचे उत्पन्न किमान दोन पटीने वाढेल. घरफाळा वसुलीतही अनियमितता दिसते. प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी.

- संदीप देसाई, पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष, आप

घरफाळा सर्वेक्षण, वसुली ही दोन्ही कामे समन्वयाने सुरू आहेत. थकबाकीदारांनी तत्काळ आपला घरफाळा भरावा. ज्यांना घरफाळ्याबाबत काही शंका आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क करून घरफाळा निश्‍चिती करून घ्यावी.

- शिल्पा दरेकर, उपायुक्त, महापालिका

Post a Comment

Previous Post Next Post