तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार मागे हटणार नाही असा इशारा स्वप्निल राजशेखर यांनी दिला.
दैनिक हुपरी समाचार :
कोल्हापूर : गेले कित्येक वर्ष आमचे श्रध्दास्थान बंद आहे. ही वास्तु ओसाड पडलीय. जो पर्यंत कोल्हापूरची अस्मिता आहे तो पर्यंत ही वास्तू फक्त कलेला वाहीलेली असावी. चित्रीकरण सुरु रहावे. अशी मागणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळा तर्फे आणि कोल्हापूरकरांची आहे अशी प्रतिक्रिया अभिनेते स्वप्निल राजशेखर यांनी व्यक्त केली. आज साखळी उपोषणात ते सहभागी झाले आहेत. जयप्रभा स्टुडिओ जागा विक्री प्रकरणी अखिल भारतीय चित्रपट महामंडळा तर्फे आज कोल्हापुरात साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. यात महामंडळाचे संचालक, सभासद, ज्येष्ठ कलावंत या उपोषणाला बसले आहेत.
यावेळी स्वप्निल राजशेखर म्हणाले, माझ्या वडिलांनी (राजशेखर) २० वर्षापूर्वी आत्मदहनाचा इशारा दिला होता. ते म्हणाले होते या वास्तूवर जर बुलडोझर फिरवला तर मी आत्मदहन करेन आणि आज २० वर्षानंतर आम्ही हेच आंदोलन पुढे चालू ठेवले आहे. तरी आमच्या प्रयत्नाला म्हणावे तसे यश नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. मात्र, यावेळी कोल्हापूरकरांनी,कलाकारांनी ठाम निर्णय घेतला आहे. जो पर्यत ही वास्तू कागदोपत्री, लिखित स्वरुपात चित्रीकरणासाठीच वापरली जाईल अशी हमी शासन, महानगरपालिकेकडून मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरुच ठेवणार मागे हटणार नाही असा इशारा स्वप्निल राजशेखर यांनी दिला.
अशा आहेत प्रमुख मागण्या
जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तात्काळ खुला करावा.
जयप्रभा स्टुडिओ मधील इमारतीसह खुली जागा आरक्षित रहावी.
चित्रीकरणा व्यतिरिक्त या जागेचा व्यावसायिक वापर होऊ नये.
महापालिकेने जयप्रभा स्टुडिओच्या व्यवसायिकिकरण व वाणिज्य वापरासाठी परवानगी देऊ नये.
जयप्रभा स्टुडिओचे जतन होण्याकरता शासन व महापालिका यांनी लक्ष घातले पाहिजे.
चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी जाधव, आय. बारगिर ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा शहा मिलिंद अष्टेकर, माजी महापौर आर,के.पवार, अभिनेते स्वप्नील राजशेखर, बाबा पार्टे, अर्जुन नलवडे आदी मान्यवर उपोषणाला बसले आहेत. शालिनी स्टुडिओ चित्रपट निर्मिती करिता आरक्षित झालाच पाहिजे, शालिनी स्टुडिओ रेखांकन आदेश रद्द झाला पाहिजे, शालिनी स्टुडिओ जयप्रभा स्टुडिओची भूमि बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही चित्रपट व्यवसाया बाबत शासन एवढे उदासीन का अशा घोषणांचे फलक ही उपोषण स्थळी लावण्यात आले आहेत.