कळंबा सातारा कारागृहातील कैदी लुटत आहेत कोरोनाच्या सुट्टीची मजा


हुपरी समाचार :

 कळंबा कारागृहातील 104 आणि सातारा कारागृहातील 110 कैदी कोरोनाच्या सुट्टीची मजा लुटत असून, त्यांपैकी काहीजण जबरी चोरी आणि हाणामारीच्या गुन्ह्यांत सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांना कारागृह प्रशासनाकडून केव्हा बोलावणे येणार, याची पोलीस आतुरतेने वाट पाहत आहेत.


कोरोनाच्या पहिल्या लाटेत सगळ्याच क्षेत्राला जबर फटका बसला. महाराष्ट्रभर नोकरीच्या निमित्ताने गेलेले चाकरमानी आपआपल्या घरी परतले होते. यातून कारागृहातील बंदिवानही अपवाद राहिले नाहीत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटांमध्ये कारागृहातील अनेक कैदी कोरोनाबाधित आढळून आले. दाटीवाटीने असलेल्या कैद्यांना संसर्ग होऊ नये म्हणून अनेक कैद्यांना आपआपल्या घरी सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला.

सातारा जिल्ह्यातील अनेक बंदिवान कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. त्यांतील 104 बंदिवानांना कोरोना काळात घरी सोडण्यात आले, तर सातारा कारागृहातील 110 बंदिवानांनाही सोडून देण्यात आले होते. आता कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे या कैद्यांना कारागृह प्रशासनाने परत बोलाविणे गरजेचे आहे. कारण यांतील काहीजण पुन्हा गुन्हे करू लागल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. जबरी चोरी, हाणामारी अशा प्रकारचे गुन्हे घडत आहेत.

काही दिवसांपूर्वी एका महिलेचा मोबाईल हिसकावून चोरट्याने पलायन केले होते. पोलिसांनी तपास करून संशयिताला पकडले, तेव्हा तो कारागृहातून बाहेर आलेला असल्याचे निष्पन्न झाले. आणखी एका संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल असून, तोही सध्या बाहेर आहे. वेगवेगळ्या गुह्यांत या संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना जामीन मंजूर न होता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही कारागृहांतील 214 कैदी बाहेर फिरत आहेत. कोणताही गुन्हा घडल्यास पोलीस पहिल्यांदा याच कैद्यांवर संशय घेत आहेत. कारण त्यांच्याकडून गुन्हे घडत आहेत. 'कारागृह प्रशासन परत बोलावत नाही तोपर्यंत यांचे असेच चालणार,' असे पोलीस बोलू लागले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post