प्लॅस्टिक कॅपिंगच्या विल्हेवाटीची जबाबदारी उत्पादक कंपन्यांवर...

 


दैनिक हुपरी समाचार :

मुंबई :  स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी अनेक उपाययोजना करणाऱया पालिकेने आता प्लॅस्टिक कॅपिंगच्या विल्हेवाटीची जबाबदारी खाद्यपदार्थ, विविध पेये बनवणाऱया कंपन्यांनाच देण्याचे धोरण आखले आहे.यासाठी मुंबईत विविध मार्गाने निर्माण होणारा प्लॅस्टिक आणि वेस्टनांचा कचरा, उत्पादक कंपन्या, विल्हेवाटीच्या पद्धती, प्रमाण याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेत प्लॅस्टिक कचरा, वेस्टनांच्या विघटनासाठी उत्पादकांची व्यवस्था नसेल तर पालिकेच्या कचरा विल्हेवाट प्रकल्पासाठी निधी पुरवण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त संगीता हसनाळे यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायटय़ांना कचऱयाचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱया इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱयाच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापनला प्रोत्साहन देण्यासाठी कचऱयाचे वर्गीकरण, ओल्या कचऱयापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱयाची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर किंवा पर्जन्य जल संधारण योजना राबविणाऱया सोसायटय़ा-आस्थापनांना करात सूट देण्यात येत आहे. त्यामुळे कचऱयाचे दिवसाचे प्रमाण सात ते साडेसात हजार मेट्रिक टनांवरून सुमारे साडेपाच हजार मेट्रिक टनांवर आले आहे.

पाणी तुंबण्यातून सुटका

मुंबईत अतिवृष्टी झाल्यास अनेक वेळ सखल भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. यामध्ये प्लॅस्टिक कचरा जलवाहिन्या, मॅनहोल आणि पाथमुखांमध्ये अडकल्यामुळेच बहुतांशी ठिकाणी पाणी तुंबल्याचे निदर्शनास येते. या पार्श्वभूमीवर प्लॅस्टिक कचऱयाच्या विल्हेवाटीसाठी घेतलेला निर्णय मुंबई पूरमुक्त करण्यासाठीदेखील होणार आहे.

पालिकेचे 200 कोटी वाचणार

विशेष म्हणजे प्लॅस्टिक बॉटल, बिस्किट, वेफर्स, खाद्यपदार्थांची वेस्टने यांच्या विल्हेवाटीच्या प्रक्रियेसाठी होणाऱया खर्चात संबंधित कंपन्यांकडून निधी घेतला जाणार असल्याने पालिकेचा सुमारे 200 ते 300 कोटींचा खर्च वाचणार असून पर्यावरण संवर्धनासाठीदेखील मदत होणार आहे. यासाठी काही पंपन्यांनी पालिकेकडे कार्यवाहीदेखील सुरू केली आहे.

कचरा निर्माण केला म्हणून केवळ नागरिकांना दंड न करता कचरा निर्मितीचे मूळ असणाऱया पंपन्यांनी आपल्या कचऱयाच्या विल्हेवाटीची जबाबदारी घेतली पाहिजे. 'पैसा कचऱयात जाण्यापेक्षा, कचऱयातून पैसा निर्माण केला पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी वेस्ट इज गोल्ड ही संकल्पना राबवली पाहिजे!'
 संगीता हसनाळे, उपायुक्त

Post a Comment

Previous Post Next Post