सांडपाणी प्रक्रियेसाठीही आता खर्च करावा लागणार


हुपरी समाचार : 

 कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्‍‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. ग्रामीण भागातील जी मोठी गावं आहेत, ज्यांचे सर्वाधिक सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. या गावांचा सांडपाणी आराखडा तयार करण्यासाठी प्रस्‍ताव मागवले होते. यामध्ये तीन संस्‍थांनी गांधीनगर, गडमुडशिंगी, वळिवडे, उचगाव, कळंबा, पाचगाव या करवीर तालुक्यातील तसेच हातकणंगले तालुक्यातील चंदूर, कबनूर, तळंदगे गावांचा अभ्यास करून प्रकल्‍प अहवाल सादर केला होता. या अहवालातील सार पाहता गावांना सांडपाणी प्रक्रियेसाठीही आता खर्च करावा लागणार आहे. घरातून, गावातून निघणारे सांडपाणी थेट नदीत न सोडता त्यावर प्रक्रिया करावी लागणार आहे. हा प्रक्रियेचा खर्च मात्र मोठा आहे. अगोदरच पाणीपट्टी देण्यास नकार घंटा देणारे नागरिक पुन्‍हा सांडपाणी प्रक्रियेसाठी किती कर देतील, हा संशोधनाचा विषय आहे.

सांडपाणी प्रक्रियेसाठी संस्‍थांनी दिलेले प्रस्‍ताव हे खर्चिक असल्याने मुंबई आयआयटीची मदत घेण्यात येत आहे. त्यांच्याच माध्यमातून हे प्रकल्‍प राबवल्यास कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार आहे. त्यामुळेच शिवाजी विद्यापीठ व केआयटी कॉलेज यांच्या माध्यमातून आयआयटीचे तंत्रज्ञान वापरून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्‍प करण्यासाठी अहवाल तयार करण्यात येत आहे.


सर्वच ग्रामपंचायती नागरिकांकडून पाणीपट्टी वसुली करतात. सांडपाणी प्रक्रियेच्या कराची शहराप्रमाणे गावातून वसुली होत नाही. मात्र, पंचगंगा नदी प्रदूषणाची दाहकता वाढत आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांनाही पुढील काळात सांडपाण्यावर प्रक्रिया करावी लागणार आहे. गावांनी पाण्याचा वापर नियंत्रित केला नाही, सांडपाण्याची निर्गत व्यवस्‍थित केली नाहीतर‍ येणाऱ्या काळात त्यांना पाणीपट्टी प्रमाणेच सांडपाणी प्रक्रियेचा करही द्यावा लागणार आहे.

संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी सांडपाण्याचे सर्वेक्षण करून त्यावर प्रक्रिया करण्याचे प्रस्‍ताव मागवले होते. यामध्ये गावांची सांडपाणी निर्मिती, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी उभारण्यात येणारे तंत्रज्ञान व त्याचा दरवर्षी देखभाल दुरुस्‍तीसाठी करावा लागणारा खर्च सादर केला आहे. बहुतांश गावांना त्यांच्या पाणीपट्टीच्या दुप्‍पट खर्च सांडपाणी प्रक्रियेसाठी करावा लागणार असल्याचे अहवालातून दिसले आहे. हा खर्च मोठा असल्याने मुंबई आयआयटीचे तंत्रज्ञान वापरुन स्‍थानिक स्‍तरावरच सांडपाणी प्रकल्‍प उभारण्याचा अभ्यास सुरू आहे. त्यामध्ये देखभाल दुरुस्‍तीचा खर्च कमी राहिल. मात्र लोकांनीच आता घरातून निघणारे पाणी कमी करण्याचा प्रयत्‍न करणे गरजेचे आहे.

संजयसिंह चव्‍हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी

Post a Comment

Previous Post Next Post