हुपरी येथील ग्रामीण रुग्णालयास लवकरच मंजुरी - आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर

 मंत्रालयात आरोग्य विभागाचे अधिकारी व शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना-राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळ यांच्या बैठकीत निर्णय.


हुपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लवकरच ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन व रेंदाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर तत्काळ सदर विषयाचा प्रस्ताव आरोग्य विभागामार्फत सादर करण्यात आला व सर्व त्रुटींची पूर्तताही करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ग्रामीण रुग्णालय मंजुरीप्रश्नी आज राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या दालनात आरोग्य विभाग व हुपरी येथील शिवसेना-राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली.

हुपरी व पंचक्रोशीतील गावांची एकूण लोकसंख्या २ लाखांवर आहे. तसेच हुपरी हे गाव चांदी उद्योगासाठी आशिया खंडात प्रसिद्ध आहे. शेजारील पंचतारांकित औद्योगिक वसाहत व लगतचा सीमाभाग यामुळे हुपरी गावाशी संपर्कात येणाऱ्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. तसेच भौगोलकदृष्ट्या हा भाग जिल्ह्यातील अत्याधुनिक आरोग्य सोयींपासून वंचित आहे.   येथील सामान्य माणसाची पुरेश्या आणि योग्य आरोग्य सेवेविना हेळसांड होत आहे. त्यामुळे हुपरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी बैठकीत लावून धरली.

बैठकी दरम्यान आरोग्य राज्यमंत्री,सर्व अधिकारी व शिवसेना-राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळामध्ये झालेल्या चर्चेनुसार लवकरात लवकर हुपरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रस्तावास मंजुरी दिली जाईल. तसेच ३० खाटांसह हुपरी येथील ग्रामीण रुग्णालय सर्व अत्याधुनिक आरोग्य सोयी-सुविधांसह सुसज्जपणे उभे राहील अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.त्यामुळे हुपरी येथील ग्रामीण रुग्णालय मंजुरीचा प्रश्न आता लवकरच महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे हुपरी येथे उभे राहणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून पंचक्रोशीतील नागरिकांची आरोग्य विषयक हेळसांड थांबणार आहे.

या बैठकीसाठी आरोग्य विभागाचे सर्व उच्च अधिकारी,उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. उज्जला माने,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कोळी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.योगेश साळे,शिवसेनेचे शिवाजी मुरलीधर जाधव,ग्रा.पं. सदस्य महेश कोरवी,संजय चौगुले,संदिप चव्हाण,राष्ट्रवादीचे बाहुबली गाट,पृथ्वीराज गायकवाड,दीपक गाट,नितीन लोहार,अजित किणीकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post