या निवडणूकीत आपला राजकीय दबदबा सिध्द करून पालकमंत्री पाटील यांनी चंद्रकांतदादांचा करेक्ट कार्यक्रम केलाहुपरी समाचार :

 कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांची विजयाकडे वाटचाल सुरु आहे या निवडणूकीत जाधव विरुध्द भाजपचे सत्यजित कदम हे उमेदवार असले तरी ती प्रत्यक्षात काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील विरुध्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वर्चस्वाची लढाई म्हणूनच पाहिले गेले.या निवडणूकीत आपला राजकीय दबदबा सिध्द करून पालकमंत्री पाटील यांनी चंद्रकांतदादांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
विधानसभेच्या २०१४ च्या निवडणूकीत कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून भाजपचे नवखे उमेदवार अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा पराभव केला. या पराभवानंतर पेटून उठलेल्या सतेज पाटील यांनी जिल्ह्यांतील महत्वाच्या सर्व सत्ता एकापाठोपाठ काबिज केल्या आहेत. विधानपरिषदेच्या २०१६ च्या निवडणूकीत त्यांनी तत्कालीन आमदार महादेवराव महाडिक यांचा पराभव करून विजयी घौडदोड सुरु केली. त्यानंतर लगेच २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी आमचं ठरलंय अशी टॅगलाईन घेवून राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांच्या पराभवात मोठी भूमिका बजावली.

त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी पुतण्या ऋतुराज पाटील याला कोल्हापूर दक्षिण मतदार संघातून भाजपच्या अमल महाडिक यांचा पराभव करून निवडून आणले आणि २०१४ च्या पराभवाची परतफेड केली. या निवडणूकीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी ज्या जोडण्या लावल्या त्यामुळे काँग्रेसचे चार आमदार निवडून आले. देशभर व महाराष्ट्रभर काँग्रेसची वाताहात होत असताना एका जिल्ह्यांतून काँग्रेसचे एवढे आमदार फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच निवडून आले. तेवढ्यावरच ही घौडदौड थांबली नाही.

पुणे पदवीधर मतदार संघाची जागा जयंत आसगांवकर यांच्या सारख्या नवख्या उमेदवारास रिंगणात उतरवून अवघ्या पंधरा दिवसांत जिंकून दाखवली. त्यानंतर डिसेंबर २०२१ मध्ये ते स्वत: विधानपरिदेच्या निवडणूकीत बिनविरोध निवडून आले. त्याशिवाय कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषदेची सत्ता त्यांनी मिळवली. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणूकीत त्यांनी तीस वर्षाची महादेवराव महाडिक यांची सत्ता उलथवून हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र ताब्यात घेतले.

कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील २०१४ च्या एका पराभवाची परतफेड म्हणून पालकमंत्री पाटील यांनी महादेवराव महाडिक त्यांचा मुलगा अमल महाडिक, पुतण्या धनंजय महाडिक व आता महाडिक यांचेच नातेवाईक सत्यजित कदम यांचा पराभव करून एका पराभवाच्या बदल्यात चार पराभव करून त्याचा वचपा घेतला आहे. या निकालाचा परिणाम कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणूकीवर होणार आहेच शिवाय राज्याच्या राजकारणात भाजपचा हिंदुत्वाचा उधळू पाहणारा रथ कोल्हापूरने रोखण्यात यश मिळविले आहे. या सगळ्याचे किंगमेकर म्हणून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचे नांव ठळक झाले आहे. राज्य मंत्रिमंडळातही आता त्यांचे वजन वाढणर आहे. या गुलालानंतर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता जास्त आहे.

Post a Comment

Previous Post Next Post