राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण सुरु झाले... राज ठाकरे

 मुंबईच्या शिवतीर्थावर मनसेचा 'पाडवा मेळावा होत आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.


या मेळाव्यासाठी मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली असून, शिवतीर्थावर गर्दी ओसंडून वाहत होती. याआधी 9 मार्चला मनसेच्या 16 व्या वर्धापन दिनी पुण्यात बोलताना राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी हा ट्रेलर असून, पिक्चर 2 एप्रिलला शिवतीर्थावर दाखवेन असे ते म्हणाले होते.

आता आज या मेळाव्यात बोलताना राजा ठाकरे यांनी सुरुवातीला, कोरोना विषाणू, महामारी व त्याकाळात भोगलेल्या अनुभवांबद्दल भाष्य केले. यावेळी त्यांनी पोलिसांना धन्यवाद दिले. त्यानंतर त्यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल आठवण करून दिली. ते म्हणाले, 'त्यावेळी भाजप आणि शिवसेनेची युती राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या विरुद्ध उभी होती. निवडणुकीआधी राज्यात भाजपच्या अनेक सभा झाल्या परंतु अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत काही चर्चा झाली नव्हती. मात्र निवडणुकीचे निकाल लागल्यावर आपल्यामुळे सरकार अडतंय हे लक्षात आल्यावर उद्धव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री पदा साठी अडून बसले. त्यानंतर राज्याचे राजकारण बदलले. लोकांनी भाजप-शिवसेनेच्या युतीला मतदान केले होते मात्र शिवसेनेने जनतेशी गद्दारी केली.'

ते पुढे म्हणाले, 'वझे यांनी एका गाडीमध्ये जिलेटीन ठेवले व ती गाडी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर उभी केली. इतकी मोठी गोष्ट इतक्या सहजासहजी घडली नसेल. देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घरासमोर बॉम्बची गाडी उभी केली जाते व त्याचे उत्तर अजूनही मिळाले नाही. दोन अडीच वर्षे तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांना मंत्री करण्यात आले. 100 कोटी मागितले म्हणून गृहमंत्री तुरुंगात गेले, दाउदशी संबंध असलेले मंत्री नवाब मलिक तुरुंगात आहेत, याबाबत सरकारला काहीही वाटत नाही. सरकार अजून चालू आहे. सरकार मतदारांचा वापर करून घेत आहेत.'

'शिवाजी महाराजांचे विचार घेऊन पुढे जायचे असेल तर सरकारमध्ये ही अशी माणसे गरजेची नाहीत. राज्यांमध्ये अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथून अनेक लोकं नोकरीधंद्यासाठी बाहेर पडतात. आता हा राज्यांचा विकास होत आहे त्याचा आनंद आहे, कारण महाराष्ट्र सर्वांचा बोझा घ्यायला रिकामा नाही.'

'1999 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून राज्यामध्ये जातीपातीचे राजकारण सुरु झाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने जाती-जातींमध्ये द्वेष पसरवला. राज्यामध्ये अजूनही जातीपातीबाबत भांडण सुरु आहे, राजकारण सुरु आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला दिशा दिली तो महाराष्ट्र जातीपाती मध्ये खितपत पडून आहे. प्रत्येक राज्याने आपली भाषा, संस्कृती, आपला विकास मोठा केला की आपोआप देशही मोठा होईल.' यावेळी त्यांनी आपण अयोध्येला जाणार असल्याचेही नमूद केले.

'मुंबईमधील अनेक लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत. 1995 साली मा. बाळासाहेब ठाकरे हे झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना मोफत घर देणार होते. त्यांचा हेतू चांगला होता. मात्र त्यानंतर मोफत घरांसाठी अनेक लोक मुंबई येऊ लागले. त्यामुळे इथल्या झोपडपट्ट्या वाढल्या. मुंबई भकास झाली, ठाणे-पुणे भकास झाले. आता नाशिकही भकास होण्याच्या मार्गावर आहे. मुख्यमंत्री आमदारांना का घरे देत आहेत? कदाचित त्यामध्ये त्यांना काहीतरी कट दिसत असेल. कोणत्याही आमदाराने घर मागितले नव्हते. आमदार-खासदारांना मिळणारी पेन्शनदेखील बंद व्हायला पाहिजे. मुंबई बिल्डरच्या घशात घालायचे काम शिवसेनेकडून सुरु आहे.'

Post a Comment

Previous Post Next Post