आज राजसाहेबांवर टिका करण्याचा अधिकार ना शिवसेनेला आहे ना राष्ट्रवादीला. कारण भुमिकेतलं सातत्य उद्धवजींनी आणि पवार साहेबांनी या आधीच दाखवून दिलय. त्यामुळे त्यांच्या चिल्लर गॅंगने गप्प राहिलेलं बरं. विषय कॉंग्रेसचा, तर ते आपल्या तत्वांसोबत आजही ठाम आहेत पण नाईलाजाने का होईना शिवसेनेसोबत जाऊन त्यांनी ही इथे तत्वांना तिलांजली दिलीच आहे.
सेनेतून बाहेर पडून २००६ मधे राज साहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. पक्षाच्या झेंड्यात भगव्या सोबत निळ्या आणि हिरव्या रंगाला स्थान देऊन सर्वसमावेशक महाराष्ट्र धर्माचा विचार घेऊन विकासाच्या मुद्द्यावरच पक्ष पुढे न्यायचा हाच मुळ उद्देश होता. आज पक्षाचा जो शिवराजमुद्रा असलेला झेंडा आहे तो देखिल त्याचवेळी निवडणुक आयोगाकडे रजिस्टर केला होता. करायचं असतं तर तेव्हाच हिंदूत्वाचा मुद्दा घेऊनच राजकारणात उतरले असते.
राज साहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा सेनेने मराठीचा मुद्दा गुंडाळून ठेवून बराच काळ लोटला होता. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मराठी माणसाला कोणी वाली उरला नव्हता. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या गायपट्ट्यातून आलेल्या परप्रांतियांची अरेरावी इथे वाढली होती. मतांसाठीच सेनेने यांची अरेरावी पोसली वाढवली तिला अभय दिलं. सेनेच्या मुंबई महापालिकेने फेरिवाल्यांकडून हप्ते घेऊन त्यांना अभय दिलं. त्यांची मनमानी वाढली आणि त्यातून मग माज आला. सेनेच्या काळातच बांग्लादेशी मुसलमान फोफावले. बेहरामपाडा चार पाच पट वाढला.
शेवटी हा परप्रांतियांचा माज उतरवला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने. दुकानावरच्या मराठी पाट्या असोत, टोलचं आंदोलन असो, फेरिवाल्यांना विरोध असो, मनसे कार्यकर्त्यांनी अंगावर केसेस घेतल्या. पेट्रोल डिझेल महागाई विरोधातही वेळोवेळी आंदोलनं केली. मनसेने विषय हाती घेण्याआधी सर्व डोळे झाकून टोल भरत होतेच. पण टोल कंट्राटदारांचा सत्ताधार्यांसोबत हात मिळवणी करुन चालू असलेला भ्रष्टाचार मनसेने लोकांसमोर आणला. श्रेय द्यायचं सोडून या विषयावरुनही टिका झाली. ती ज्यांचे या टोलझोल मधे हात बरबटले होते त्यांनीच पद्धतशीरपणे केली. पण मनसेने हा भ्रष्टाचार उघड केल्यानंतरच अनेक टोल नाके बंद झाले हे कोणिही नाकारु शकत नाही.
२००६ ला स्थापन झालेला पक्ष विकासाचा एक मुद्दा घेऊन सतत लोकांसमोर येत होता. विकासाचा आराखडा जनतेसमोर सादर झाला असता आणि मिडियाने त्यादिवशी साथ दिली असती तर महाराष्ट्राच चित्र आज वेगळं असतं. पण त्याच दिवशी सेना भाजप ठरवून खेळ खेळले आणि या विकास आराखडा लोकार्पण सोहळ्याला लोकांपर्यंत पोचूच दिलं नाही.राज ठाकरेंच पुढे येणं कोणत्ताही पक्षाला परवडणारं नव्हतं. खोट्याच्या आधारावर उभ्या केलेल्या त्यांच्या डोलार्याला सुरुंग लावण्याचं काम राज ठाकरे करु शकतात हे माहीत होतं. म्हणुन राज ठाकरेंची सतत फुकटची बदनामी करत रहाणं हा एककलमी कार्यक्रम सर्व पक्षांनी राबवला.नाशिकला कधी झालं नव्हतं असं काम करुन दाखवलं तरी लोकं विकास सोडून भावनेच्या नादी लागले. आज पर्यंत कधी राज साहेब राजकारण खेळले नाहीत. या दलदलीत उतरले नाहीत. पण कालच्या भाषणाने जाणवलय की ते आता राजकारणात उतरण्यास सिद्ध झालेत. कालचं भाषण तर फक्त सुरुवात आहे.
पक्ष स्थापने नंतर तब्बल २०१८ ला राज साहेबांनी मशिदीच्या भोंग्यांचा विषय काढला कारण त्याला तशी पार्श्वभूमी होती. काल पुन्हा तो विषय काढला. या आधी शिवसेनेने हीच मागणी ऑफिशियल पत्र लिहून केंद्राकडे केली होती. भाजप सेनेचं एकत्रित हिंदूत्ववादी सरकार सत्तेत असताना हे भोंगे का उतरवले नाहीत ? कारण त्यांनाही तेव्हा मुस्लिम मतांची गरज होतीच. या देशातील मुस्लिम समाज सर्वांना फक्त मतांसाठीच हवाय. गरज संपली की तुमच्यावरच प्रेम संपलं मग तुम्ही फक्त पाकिस्तानी आणि बांग्लादेशी. आज महाविकास आघाडीचा मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या संजय राऊतांचीच मागणी होती की देशातल्या सर्वच मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या, मग बघा कसे वठणीवर येतात ते हे विसरलात ? काय किंमत आहे तुमची यांच्या लेखी हे कधी समजणार ?
माझा कोणाच्याही प्रार्थनेला विरोध नाही हे काल भाषणात स्पष्ट केलंच आहे. युरोप अमेरिकेत अनेक मुस्लिम आहेत. तिथे भोंगे चालतात.. ? तिथे विरोध होतो ..? झेंड्याचे तीन रंग सांगताना अब्दुल कलामां सारखा जो मुसलमान आहे तो माझा आहे हे अभिमानाने सांगितलं होतं. अनेक मुस्लिम मनसैनिक आहेत त्यांचा अभिमान आहेच. या देशाला, या राज्याला आपल्या मराठी भाषेला आपलं मानणारे सर्व आपलेच आहेत. द्वेष भावना धर्माविरोधात नाही तर ती धर्मांधते विरोधात आहे.
शरद पवारांवर, राष्ट्रवादीवर खालच्या पातळीवर टिका करणारे आज मांडीला मांडी लावून सत्तेत बसलेत. शरद पवारांनी तर किती रंग बदलले याचा विचार करायला गेलो तर डोकं भणभणेल. भाजपने न मागता पाठींबा देणार्या शरद पवारांचे कार्यकर्ते आज मनसे भाजप संभाव्य युतीवर टिका करतायत. अरे तो अधिकार उरलाय का तुमच्याकडे ? सकाळची डेट यशस्वी ठरली असती तर आज नवाब शरिफ, चंपा, फडणवीस, अजित दादा सगळे मांडीला मांडी लावून बसलेले दिसले असते आणि आमचे राष्ट्रवादी वाले मित्र उद्धव आणि सेनेवर टिका करताना. असो.
अजून लिहायचय. लिहिन....
पण आत्ता तरी राजसाहेबांना आणि मनसेला या राजकारणाच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा. संभाव्य मनसे भाजप युतीचं ही स्वागतच. जसा तुम्हा सर्वांना हवी ती तडजोड करुन राजकारणात मोठं व्हायचा हक्क आहे. तसा आम्हालाही आहेच. त्यामुळे पाय ओढू नका. शुभेच्छा द्या आशिर्वाद द्या. राजकारणात, सत्तेत राज ठाकरे हा माणूस मोठा झाला तर महाराष्ट्रालाच आणि त्यामुळे आपल्या सर्वांनाच चांगले दिवस दाखवल्या शिवाय रहाणार नाही याची खात्री बाळगा.