हुपरी समाचार :
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर आज राज्यभरात मनसैनिकांकडून आंदोलन केलं जात आहे.राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधातील आपल्या भूमिकेवर ठाम राहत आजपासून मशिदींमधून भोंग्यांवर अजान ऐकू आल्यास हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन केलं असून त्याला कार्यकर्त्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी राज्यभरात प्रतिबंधात्मक कारवाई केली असून अनेक नेते, पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. तसंच मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मुंबई पासून अनेक शहरांमधील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. दरम्यान बुधवार पहाटेपासूनच अनेक ठिकाणी भोंग्यावर नमाज न होता भोंग्याशिवाय नमाज अदा करण्यात आल्याचंही दिसून आलं आहे. राज यांच्या या भूमिकेनंतर आज दिवसभरामध्ये भोंग्यांचा हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चेत राहण्याची शक्यता आहे.
11:06 (IST) 4 May 2022
राज ठाकरेंनी आरती केलेल्या मंदिरात आज महाआरती
पुण्यातील कुमठेकर रोडवरील खालकर चौक येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मारुती मंदिरात हनुमान चालीसाचे पठण करण्यात आले होते. याच मंदिरात आज महाआरती करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक राज्य सरचिटणीस अजय शिंदे होते. विश्रामबाग पोलिसांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे.
11:03 (IST) 4 May 2022
पुण्यात मोठा पोलीस बंदोबस्त, पोलिसांची गल्ली बोळात गस्त
मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांची गल्ली बोळात गस्त सुरु आहे. सोमवार पेठ, सदाशिव पेठ, कोथरूड, कात्रज भागावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
10:59 (IST) 4 May 2022
पिंपरी-चिंचवडमधील मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले ताब्यात
पिंपरी-चिंचवड मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह चार जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सकाळपासूनच मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. चिखले हे त्यांच्या घरी असताना निगडी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांना ताब्यात घेतल्याचे निगडी पोलिसांनी सांगितले आहे.
10:52 (IST) 4 May 2022
राज ठाकरे आज घेणार पत्रकार परिषद
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे भोंग्यां विरोधातील आंदोलनाबाबत आपली पुढील भूमिका मांडण्याची शक्यता आहे. या बैठकीत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता आहे.